श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:45 PM2017-11-22T23:45:39+5:302017-11-22T23:46:16+5:30
आमचा देवाधर्माला विरोध नाही. परंतु देवाधर्माच्या नावाखाली कुणाची फसवणूक होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : आमचा देवाधर्माला विरोध नाही. परंतु देवाधर्माच्या नावाखाली कुणाची फसवणूक होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधन करीत अंधश्रद्धा दूर करण्याचे करण्याचे काम केले. संत परंपरा व बुवाबाजी या फरक आहे. लहानपणी झालेल्या संस्कारात श्रद्धा शिकविली जायची. परंतु या श्रद्धेचे रूपांतर केव्हा अंधश्रद्धेत होते हे कळत नाही. त्यामुळे श्रद्धा डोळस असली पाहिजे. तिची चिकित्सा करता आली पाहिजे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांनी केले़
अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने संत गाडगेबाबा प्रबोधन अभियानातांर्गत ‘वृक्ष तिथे छाया-बुवा तिथे बाया’ याविषयावर श्रीगणेश शाळेच्या प्रांगणात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुनील मेंढे, अर्बन बँकेचे संचालक उद्धव डोरले, अंनिसचे जिल्हा संघटक वसंत लाखे, जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, सचिव मुलचंद कुकडे, अशोक गायधनी, किर्ती गणवीर, डी़ जी़ रंगारी, प्रिया शहारे, दिनेश गायधने, शिल्पा बन्सोड उपस्थित होते़
यावेळी प्रा.श्याम मानव यांनी सत्यसाईबाबा कशाप्रकारे चमत्कार करून दाखवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आणि त्यामागील हातचालाखीही सांगितली़ हवेतून सोन्याची चेन काढणे, सोन्याची अंगठी निर्माण करणे, यज्ञाची अग्नी प्रज्वलित करणे आणि त्यामागील हातचलाखी समजावून सांगितले. जादूटोनाविरोधी कायदा विस्ताराने समजावून सांगताना प्रा.मानव म्हणाले, स्त्रीचा सन्मान झाला तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करून स्त्रीयांचे शोषण करण्याचा प्रकार वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे जादूटोनाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर प्रत्येक व्यक्ती विज्ञानवादी होईल, असे सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळ १९८२ मध्ये ही सुरू झाली असून ही जगातील पहिली चळवळ असल्याचे सांगताना प्रा.मानव म्हणाले, मानवी ज्ञानात उत्तरोत्तर प्रगती होत असली तरी आजही मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा या दोन्हीमध्ये फरक आहे. जी गोष्ट खरी नसल्याचे माहित असूनही त्या गोष्टीला कवटाळून बसणे म्हणजे अंधश्रद्धा होय. श्रद्धा हा शब्द नसून प्रक्रिया असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी कृपालू महाराज, सुंदरदास महाराज, शुकदास महाराज, काटेलचे गुलाबबाबा, केडगावकर महाराज, आसारामबापू, रामरहिम, नारायणसाई, स्वामी विद्यानंद या महाराजांचे किस्से सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले़ संचालन ग्यानचंद जांभुळकर यांनी तर आभारप्रदर्शन रत्नाकर तिडके यांनी केले. कार्यक्रमासाठी एस़ बी़ भोयर, रामभाऊ येवले, सोनिया डोंगरे, रंजू बांगरे, मंजू गजभिये व समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले़