कामचुकारपणा खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:11 AM2019-06-08T00:11:42+5:302019-06-08T00:12:20+5:30
शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा विकासाची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आहे. विकासकामे गतीने करून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला पाहिजे. या बाबतच्या कामांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आपण खपवून घेणार नाही, असा इशारा आ.डॉ.देवराव होळी व आ.कृष्णा गजबे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा विकासाची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आहे. विकासकामे गतीने करून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला पाहिजे. या बाबतच्या कामांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आपण खपवून घेणार नाही, असा इशारा आ.डॉ.देवराव होळी व आ.कृष्णा गजबे यांनी दिला.
धानोरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी जि.प.हायस्कूलच्या सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी आ.डॉ.देवराव होळी तर सहअध्यक्ष म्हणून आ.कृष्णा गजबे होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अजमन राऊत, उपसभापती अनुसया कोरेटी, जि.प.सदस्य लता पुंगाटे, श्रीनिवास दुलमवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, नगराध्यक्ष लीना साळवे, भाजपचे पदाधिकारी साईनाथ साळवे, नायब तहसीलदार भगत, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, ताराबाई कोटांगले, माजी आ.हरिराम वरखडे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष बाळू उंदीरवाडे, प्रकाश काटेंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेला अनुपस्थित असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आमसभेत ठराव घेण्यात आला. सतत तीन वर्ष गैरहजर असणाºयांची वेतनवाढ रोखण्यात यावी, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी कुशल कामावर खर्च करण्याचे ठरविण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन बांधकामासाठी शासनस्तरावरून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा हा ठरावही मंजूर करण्यात आला.
चिचोली-सालेभट्टी दरम्यानच्या कठाणी नदीवर पुलाची निर्मिती करून मुस्का बसफेरी सुरू करण्यात यावी, ग्रामसभेचे नियोजन निमगाव येथे करण्यात यावे, सावंगी-पेंढरी मार्गे बसफेरी सुरू करण्यात यावी, वर्ग २ च्या जमिनीची वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यात यावे आदी बाबी ठरविण्यात आल्या. मोहली ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक विहिरींमधील गाळाचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी गावातील सर्व विहिरींमधील गाळ उपसण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर हा ठराव पारित करण्यात आला. तसेच सदर गावातील नळ योजनेची विहीर सुद्धा स्वच्छ करण्यात यावी, असे ठरविण्यात आले.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची महामंडळाने आठवडाभरात उचल करावी, असा ठराव पारित करण्यात आला. खुटगाव येथे अंगणवाडीची इमारत जीर्ण असल्यामुळे पालकांना पावसाळ्यात धोका होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी नव्याने इमारत बांधकाम करण्यात यावे, ग्रामपंचायतीअंतर्गत पूर्वीप्रमाणेच विद्युत सेवकाची नेमणूक करण्यात यावी, गोंडीभाषा व लिपीचा अभ्यासक्रमात समावेश करावा, धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये दफनभूमीपर्यंत सिमेंट काँक्रिट रोड निर्माण करण्यात यावे, सौभाग्य योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक मीटर त्वरित लावण्यात यावे, अंगणवाडी व जि.प.शाळांचे वीज बिल शासनाने अदा करण्यासाठी तरतूद करावी, पत्रकार संघाच्या पत्रकार भवनासाठी नगर पंचायत प्रशासन किंवा महसूल विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी आदी ठराव पारित करण्यात आले. या सभेला पं.स.च्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.
पन्नेमारातील रस्ते व मॉडेल स्कूल इमारत बांधकामाची तक्रार
धानोरा पंचायत समिती अंतर्गत पन्नेमारा ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये सीसी रोड व नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र सीसी रोडच्या कामात दर्जा नसल्याबाबतची तक्रार अनेकांनी आमसभेत केली. सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर चौकशी करण्याचे आश्वासन आ.डॉ.देवराव होळी यांनी दिले.
जि.प.शिक्षण विभागामार्फत मोहली येथे मॉॅडेल स्कूल चालविले जाते. सदर शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र येथेही दर्जा नसल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.