‘त्या’ शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:02 PM2018-01-08T22:02:45+5:302018-01-08T22:03:10+5:30
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून आणेवारी जाहिर करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून आणेवारी जाहिर करण्यात आली. त्यानुसार मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली व लाखांदूर या तालुक्यांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली. भंडारा व पवनी या तालुक्याची आणेवारी ५६ पैसे दर्शविण्यात आली. याचाच अर्थ, भंडारा व पवनी तालुक्यातील केवळ आठ गावे वगळून २९९ गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे, फेरसर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकºयांना लाभ देण्यात यावा. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रपरिषदेत दिला.
भंडारा आणि पवनी या दोन तालुक्यातील २९९ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक दाखविल्याने शेतकºयांवर अन्याय झाला. यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. याप्रकरणात भंडाराचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणीही भोंडेकर यांनी केली.
मागीलवर्षीच्या पावसाळ्यात कमी पर्जन्यमानामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पेरणी आणि अन्य शेतीची कामे विलंबाने सुरू झाली. बहुतेक गावात दुबार पेरणी करावी लागली. भंडारा जिल्ह्यात धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भंडारा तालुक्यातील १८८ गावांपैकी २२ गावे पीक नसलेली आहेत तर १६६ गावे खरीप पिकांची आहेत. नवेगाव रिठी या एकाच गावाची आणेवारी ३३ पैसे असून, उर्वरित १६५ गावांची आणेवारी ५० पैशाच्या वर दर्शविण्यात आली आहे.
पवनी तालुक्यातील १४१ गावांपैकी, तिर्री, भिवखिडकी, जांबेखानी, रेंगेपाररिठी, शेगाव, कवलेवाडा व कमकाझरी या ७ गावांची आणेवारी ५० पैशाखाली तर उर्वरित १३४ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त दाखविण्यात आली.
दोन्ही तालुक्यातील शेतकºयांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार असून, अन्य घटकांनाही याचा लाभ मिळणार नाही. येथील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला लाभापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असून, भंडारा विधानसभा मतदार संघात समाविष्ट या दोन तालुक्यांवर हेतुपुरस्पर अन्याय करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेला उपसभापती ललित बोंद्रे उपजिल्हाप्रमुख अनिल गायधने, सुरेश धुर्वे उपस्थित होते.