पुस्तके फाटेपर्यंत झोपून अभ्यास करू नका
By Admin | Published: February 7, 2017 12:27 AM2017-02-07T00:27:06+5:302017-02-07T00:27:06+5:30
झोपून अभ्यास करू नका. यामुळे पुस्तके अंगाखाली दबून फाटतात. झोपीत वाचन केलेले ज्ञान स्मरणात राहत नाही. दिवसा स्वप्न बघा.
सुरेश खोब्रागडे यांचे प्रतिपादन : स्नेहा कन्या विद्यालय शाळेत स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
पिंपळगाव (सडक) : झोपून अभ्यास करू नका. यामुळे पुस्तके अंगाखाली दबून फाटतात. झोपीत वाचन केलेले ज्ञान स्मरणात राहत नाही. दिवसा स्वप्न बघा. कठीण परिस्थितीत आपलाच मार्ग शोधावा लागतो. परिणामी आपली लढाई कोणाशी व केव्हा लढतो आहे व त्यासाठी आपण समर्थ आहोत की नाही?, याचाही विचार करून लढलो पाहिजे. यशस्वी होण्यासाठी, जिंकण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण बाळगून तयारी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ महाविद्यालय लाखनी येथील प्राध्यापक सुरेश खोब्रागडे यांनी केले.
स्थानिक स्नेहा कन्या विद्यालयात तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी स्नेहा शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गिऱ्हेपुंजे तर, अतिथी म्हणून पिंपळगावच्या प्रभारी सरपंच लक्ष्मी भाजीपाले, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुषमा कापगते, माजी सरपंच कृष्णा रोकडे, सामेवाडाचे सरपंच केशव बोळणे, गटसाधन केंद्र लाखनी साधन व्यक्ती नरेश नवखरे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी त्यांच्या कल्पकता व प्रायोगिक दृष्टीकोण यातून तयार केलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन केशव बोळणे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ५५ प्रतिकृती विद्यार्थिनींनी विज्ञान शिक्षक छबीलाल गिऱ्हेपुंजे, भीमराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तयार करून त्यांचे सादरीकरण केले. शारीरिक कवायतीनुसार सुभाष कापगते यांच्या मार्गदर्शनातून तयार केलेले लेझीम नृत्य सादर झाले. तसेच गाईड पथक गणवेशामध्ये उपस्थित राहून विद्यार्थिनीमध्ये शिस्त व शांतता राखण्याचे काम पार पाडले. शैला टिचकुले व प्रेरणा कंगाले या शिक्षिकांच्या मार्गदर्शनात तयार झालेले सांस्कृतिक नृत्य ‘हम बेटी है हिंदुस्थान की’ वर्ग ७ च्या विद्यार्थिनींनी उद्घाटनप्रसंगी सादर केले. गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार केला.
साधन व्यक्ती नरेश नवखरे यांनी सी.बी.एस.ई. शाळेतील विद्यार्थी इंग्रजी बोलतो. त्यापेक्षा आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमानुसार जि.प. मराठी शाळेतील विद्यार्थी सुद्धा इंग्रजी बोलालया शिकले.गुरुजनांनी परिश्रम घेणे हीच आजची गरज आहे.
प्राध्यापक होमदेव कापगते यांनी, विद्यार्थी हा बुद्धीमत्तेने सक्षम आहे. त्याला कॉपी करून परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. त्याने सातत्याने अभ्यास सरावातूनच परीक्षा उत्तीर्ण करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थिनींना शिस्त, शिक्षण यातून चारित्र घडवावे. परिश्रम, आत्मविश्वास हीच यशाची जननी आहे असे अध्यक्षीय स्थानावरून बोलले.
यावेळी मार्च २०१६ च्या शालांत परीक्षेत प्रथम येणारी पूजा सद्गुरु उके या विद्यार्थिनीचा तिच्या मातेसह ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गुणवत्तेचा सत्कार केला. त्यामुळे त्यांना आत्मसन्मान मिळाले.
कार्यक्रमला ग्रामपंचायत सदस्या मंजूषा शेळके, सुलोचना उईके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मार्कंड रोकडे, दिपाली कमाने, अर्चना दिघोरे, अभिजीत घारपुरे, गजानन शेंडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश रोकडे, सोपान कपाने, परमपूज्य परमात्मा मार्गदर्शन रमेश धनजोडे, देवराम वाघमारे, रविंद्र मसराम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाकरिता शाळेतील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका गीता बोरकर, सूत्रसंचालन नंदकुमार खेडीकर व सर्वांचे आभार विलास कालेजवार या शिक्षकांनी केले. (वार्ताहर)