शिक्षकांवरील अन्याय खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:38 AM2017-10-08T00:38:53+5:302017-10-08T00:39:05+5:30
खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. यापुढे शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली न निघल्यास त्यांच्यावर होणारे अन्याय खपवून घेणार नाही असा इशारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी दिला.
शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब थोरात यांच्या कक्षात शुक्रवारला सहविचार सभा पार पडली. यावेळी सुधाकर अडबाले यांनी सदर इशारा दिला. यावेळी सर्व समस्या मार्गी न निघाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनही करण्याचा इशारा यावेळी शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला. यावेळी झालेल्या सहविचार सभेत शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक तक्रारींवर चर्चा करून कायमस्वरुपी त्या निकाली काढण्याचे ठरविण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या समस्यांबाबत झालेल्या चर्चेमधून प्रामुख्याने खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वेतन बँकेकडून उशिरा होत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन मिळावे, शाळेमध्ये पद वाढले असतील तर अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मुळ शाळेत बोलाविण्याचे ठरविण्यात आले. नगरपरिषद शाळांच्या शिक्षक कर्मचाºयांना भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मिळालेला नाही. याबाबत महिनाभराच्या आत सभा बोलावून हिशोब चिठ्ठी देण्याचे मान्य करण्यात आले. महिन्याच्या पहिल्या तारखेला शिक्षकांचे वेतन देण्याचे ठरविले. वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकांची तारीख देण्याचे आश्वासन देण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाºयांची सर्व देयके कोषागारात पाठवून १६ आॅक्टोबरला नोटीस बोर्डवर सूचना लावण्याचे मान्य करण्यात आले. २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांबाबत मार्गदर्शन मागविण्याचे ठरले आदी मागण्यांची यावेळी पूर्तता करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी डी.एल. थोरात यांनी दिले.
यावेळी जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, बी.डी. मारबते, चंद्रशेखर रहांगडाले, श्रीधर खेडीकर, डी.आर. वंजारी, सुधाकर देशमुख, पुरुषोत्तम लांजेवार, उमेश पडोळे, अनिल कापटे, डी.पी. सोनकुसरे, डी.एन. टेंभुर्णे, धीरज बांते, आर.पी. मरसकोल्हे, एस.एस. खोब्रागडे, अनंत जायभाये, शामराज गावड आदी उपस्थित होते.