वाहन चालविताना नियमाचे उल्लंघन करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:47+5:302021-02-10T04:35:47+5:30
सुशांत पाटील : अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान अडयाळ : दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन ...
सुशांत पाटील : अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान
अडयाळ : दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर अवश्य करावा, वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात व मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, मोबाइल फोनचा वापर करू नये, धोकादायकरीत्या वाहन चालवू नये, तसेच पादचाऱ्यांनी झेब्राक्रॉसिंगच्या ठिकाणाहून रस्ता ओलांडावा व वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, पायी चालताना व वाहन चालविताना नियंत्रण व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी केले.
भंडारा जिल्हा पोलीसतर्फे जिल्हाभरात ३२वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान, सडक सुरक्षा-जीवन रक्षा अभियान सुरू आहे त्या निमित्ताने अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अडयाळ येथील अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानमधील एकूण दहा सोनेरी नियमांचे पत्रक वाटप करण्यात आले. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पाटील म्हणाले, भविष्यात आपण आणि आपल्यामुळे दुसऱ्याचे प्राणही जाणार नाहीत, तसेच अपंगत्वही येणार नाही, बऱ्याच अपघातात बऱ्याच वाहनचालक तथा पादचारी यांचा अपघात होऊन कधी हात, पाय तर कधी दृष्टीही गमवावी लागते. त्यामुळे वाहतूक नियमांचे नियमित पालन करा व घरातील प्रत्येकाला पालन करायला सांगा, असेही यावेळी विद्यार्थ्यांना आवाहन ठाणेदार सुशांत पाटील यांनी केले. विशेषतः विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारच्या माहिती, अडीअडचणीसाठी अडयाळ पोलीस स्टेशनमध्ये बिनधास्तपणे यावे आणि आपली समस्या असेल ती सांगावे, यासाठी चोवीस तास सदैव पोलीस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असेही मत यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
मंचकावर पोलीस निरीक्षक सुशांत पाटील शाळेचे पर्यवेक्षक चरणदास बावणे, प्रशांत संतोषवार, विलास कुंभारे, तसेच जितेंद्र वैद्य अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. संचालन जगदीश बोरकूट यांनी तर कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.