मधमाशांच्या दहशतीत विद्यार्थी करतात ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:15 PM2018-02-20T23:15:39+5:302018-02-20T23:15:55+5:30
आथली येथील जिल्हा परीषद शाळेतील प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडावर मागील काही दिवसांपासून मधमाशाचे पोळे आहेत.
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : आथली येथील जिल्हा परीषद शाळेतील प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडावर मागील काही दिवसांपासून मधमाशाचे पोळे आहेत. या मधमाशांच्या हल्ल्यात आतापर्यंत ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना दारे, खिडक्या लावून मधमाशांच्या दहशतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र कुणीही दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल न घेतल्यास २१ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लाखांदूर तालुक्यातील आथली हे १,५०० लोकवस्तीचे गाव आहे. येथे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायत भवन हे एकाच प्रांगणात आहेत. या इमारतीच्या मध्यभागी वडाचे जुने झाड आहे. या झाडावर शंभराहून अधिक आग्या व येन्दया अशा दोन प्रकारचे मधमाशांचे पोळे आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत १ ते ७ वर्ग असून त्यात ११२ विद्यार्थी व ६ शिक्षक, अंगणवाडी केंद्रात ६० विद्यार्थी आहेत.
या वडाच्या झाडाखाली बोरवेल आहे. त्या ठिकाणी शालेय विद्यार्थी पाणी पितात. दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम सुरू असताना स्वयंपाकाच्या धुरामुळे मधमाशा उडून वर्गखोलीत जातात. तिथे असलेल्या लोकांवरही त्या हल्ला करतात.
मागील महिनाभरापासून मधमाशांनी कहर केला आहे. आतापर्यंत मधमाशांच्या हल्ल्यात आचल सुखदेवे, समीक्षा सुखदेवे, वृंदा बागडे, कला शहारे, दिव्या सुखदेवे, सानिया रामटेके, सुमित नागोसे, मोनिका शहारे, आर्यन नागोसे, तन्मय ठाकरे, सुजल ठाकरे, तर शिक्षक चकोले, राऊत, मुख्याध्यापक शेंडे, शिक्षिका मुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दिलीप सुखदेवे, सुरेश ठाकरे अशा अनेकांना मधमाशांनी चावा घेतला आहे.
त्यामुळे यासंदर्भात खंडविकास अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, वनक्षेत्राधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत, शिक्षण समितीने निवेदन दिले. मात्र कुणीही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन मधमाशांचे पोळे हटविण्याची उपाययोजना करण्याची मागणी सरपंच ठाकरे, उपसरपंच खेमराज मेश्राम, शेखर ठाकरे, तिलकदास बागडे, दिलीप सुखदेवे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह या शाळेमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.