मुख्यमंत्री सडक योजनेची कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:07+5:302021-05-21T04:37:07+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्य महामार्ग क्रमांक ११ वर खोली बोंडे मार्ग किंमत २६०.८५ लक्ष, चापटी ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्य महामार्ग क्रमांक ११ वर खोली बोंडे मार्ग किंमत २६०.८५ लक्ष, चापटी ते सावरटोला-बोरटोला मार्ग किंमत १५६.७१ लक्ष, पुष्पनगर अ ते पुष्पनगर ब किंमत १४५.२९ लक्ष, तुकुम सायगाव ते कन्हाळगाव १५६.१० लक्ष ही चार कामे मंजूर आहेत. कंत्राटदारांशी करारनामे करण्यात आले.
करारनामे होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही काही कामांना तर अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही. चापटी- सावरटोला या मार्गावर कंत्राटदारांनी जिकडेतिकडे खड्डे पाडून रस्त्यांची दुर्दशा केली आहे. यावर्षी लवकर येणारा पावसाळा लक्षात घेता सदर कंत्राटदाराच्या चुकीमुळे हे रस्ते होणार नाहीत, असे चित्र आहे.
एवढा मोठा निधी मंजूर असूनही परिसरातील शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना या रस्त्यात झालेल्या खोदकामाचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे यंत्रणेने वेळीच कंत्राटदाराकडून कामे करून घ्यावीत. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई करावी. जेणेकरून शासनाच्या निधीचा योग्य वापर होऊन जनतेला न्याय मिळेल, अशी मागणी सावरटोलाचे सरपंच युवराज तरोणे यांनी केली आहे. आता याकडे जिल्हा प्रशासन किती लक्ष देते व सदर कंत्राटदारांवर कारवाई करून कामे कशी पूर्ण होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.