दिव्यांगांची कामे प्राधान्याने करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:50 PM2018-12-03T21:50:33+5:302018-12-03T21:50:45+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे न ठेवता त्यांची कामे प्रथम प्राधान्याने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे केले. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्या साधून जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे न ठेवता त्यांची कामे प्रथम प्राधान्याने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे केले.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्या साधून जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, प्रत्येक मतदार लोकशाहीचे अभिन्न अंग आहे. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देश्याने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूक’ हे घोष वाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नोंदणी करणे व मतदानाचे वेळी त्यांना विशेष सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयात ३२०० अपंग मतदाराची मतदार यादीत नोंदणी झाली आहे. मतदानाच्या वेळी अपंग व्यक्तींना मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याची व्यवस्था निवडणूक विभाग करणार आहे. ग्रामपंचायतने आपल्या निधीमधून व्हिलचेअर अपंग बांधवांसाठी खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलतांना रवींद्र जगताप म्हणाले, अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी अपंग व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, त्यांची कामे वेळेत होतील यावर लक्ष द्यावे. निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास अपंग बांधव मतदान प्रक्रियेत सन्मानाने सहभागी होतील, असे ते म्हणाले.
निवडणूक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पधेर्तील विजेत्यांना उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. वकृत्व स्पर्धा प्रथम प्रवीण शहारे, द्वितीय प्रवीण मांदाडे, तृतिय चंद्रकांत मारबते, निबंध स्पर्धा प्रथम सरिता राघोर्ते, द्वितीय शैजल ताले, तृतीय सुरज डोंगरे व चित्रकला स्पर्धेत प्रथम साजन गभणे, द्वितीय सरिता राघोर्ते आणि तृतीय सुदेश मांदाळे यांचा समावेश आहे.
विविध उपक्रम
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे समाजातील प्रत्येक घटकांसाठी तसेच दिव्यांग, मुकबधीर, कर्ण बधीर मतदारांसाठी विशेष मोहीम राबवून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात आले. मुकबधीर, कर्णबधीर या नवीन मतदारांशी संवाद साधण्याकरीता सांकेतीक भाषाची कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत दिव्यंग बांधवांना विशेष प्रशिक्षण दिले होते.