रेती देता का.. रेती... नदी तीरावरील गावात ५० घरकुलांचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 05:00 AM2022-02-09T05:00:00+5:302022-02-09T05:00:12+5:30
तामसवाडी (सिहोरा) येथे ५० घरकुल मंजूर आहे. काही घरकुलांचे बांधकाम सुरू असून स्लॅबपर्यंत काम आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. गावापासून वैनगंगा नदीचा तीर हाकेच्या अंतरावर आहे. महसूल प्रशासनाने रेती चोरी होऊ नये, यासाठी महसूल कर्मचारी तैनात केले आहेत. नियमानुसार त्यांना नदी पात्रातून रेती घरकुल बांधकामाकरिता नेता येत नाही. त्यामुळे घरकुलांचे काम रखडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गावापासून नदी हाकेच्या अंतरावर असूनही घरकुल लाभार्थ्यांना रेतीसाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे पन्नास घरकुलांचे काम महिनाभरापासून रखडले आहे. नियमानुसार रेती मिळण्यास लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सिहोरा) येथील लाभार्थ्यांना रेती देता का... रेती... असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तामसवाडी (सिहोरा) येथे ५० घरकुल मंजूर आहे. काही घरकुलांचे बांधकाम सुरू असून स्लॅबपर्यंत काम आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. गावापासून वैनगंगा नदीचा तीर हाकेच्या अंतरावर आहे. महसूल प्रशासनाने रेती चोरी होऊ नये, यासाठी महसूल कर्मचारी तैनात केले आहेत. नियमानुसार त्यांना नदी पात्रातून रेती घरकुल बांधकामाकरिता नेता येत नाही. त्यामुळे घरकुलांचे काम रखडले आहे. घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीतून पत्र घेऊन ते पत्र गटविकास अधिकाऱ्यांना द्यायचे असून त्यानंतर ते पत्र तहसील कार्यालयात नेऊन देणे गरजेचे आहे. तहसील प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतरच घरकुल लाभार्थ्यांना रेती नेण्याची मंजुरी मिळणार आहे.
स्थानिक स्तरावरच रेती द्या
- तामसवाडी रेती घाटातून अवैध रेतीचा प्रचंड उपसा होत होता. त्याकरिता महसूल प्रशासनाने या घाटातून रेतीची चोरी होऊ नये, याकरिता महसूल कर्मचारी नियुक्त केले आहेत. ही बाब कौतुकास्पद असली तरी स्थानिक घरकुल लाभार्थ्यांना मात्र येथे अनंत अडचणी येत आहेत. महसूल प्रशासनाने स्थानिक स्तरावर घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासनाने येथे तत्काळ रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.