मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेता का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:54 IST2024-06-07T16:54:02+5:302024-06-07T16:54:40+5:30
महिलांनो, काळजी घ्या : अन्यथा हार्मोन्सवर होऊ शकतो परिणाम

Do you take pills to prolong your period?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिला खूप वेळा पुढे ढकलण्यासाठी किंवा मासिक पाळी थांबविण्यासाठी गोळ्या घेतात. मात्र, असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा गोळ्या घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा तुरस्कर यांनी दिला आहे.
महिलांमध्ये मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातून एकदा ती प्रक्रिया महिलांच्या शरीरात होत असते; पण याला धार्मिक बाबींशी जोडल्याने किंवा इतर कारणांनी अनेकदा महिलांना मासिक पाळी उशिरा यावी असे वाटते. धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा इतर बाबींमुळे काही महिला मासिक पाळी लांबविण्यासाठी हार्मोनल गोळ्या घेतात; पण या गोळ्या खाण्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या नकोच
कोणतीही आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नयेत. बरेचदा सल्ल्याविना गोळ्या घेतल्यास त्याचे शरीरावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असा प्रकार टाळावा.
मासिक पाळीच्या चक्रावर होणारे परिणाम
शरीरावर रिऍक्शन
कोणतीही आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नयेत. बरेचदा विनासल्ल्याने गोळ्या घेतल्यास त्याचे शरीरावर रिअॅक्शन होऊ शकते.
प्रजननासंबंधित समस्याः
अशा गोळ्यांमुळे मासिक पाळी अनियमित होऊन प्रजननासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा गोळ्या घेतल्याने मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो.
गर्भाशयातील समस्या
वारंवार गोळ्या घेतल्यास गर्भाशयासंदर्भातील समस्या उद्भवू शकतात. ओटीपोटात प्रचंड वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या वारंवार घेऊ नये.
ऐका... स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला
सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊच नका
"अनेक महिला आपल्या मर्जीनुसार मासिक पाळीची तारीख मागे-पुढे करण्यासाठी गोळ्यांचा वापर करताना दिसून येतात. अशा गोळ्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्लाही घेत नाहीत. मात्र, अशा प्रकारामुळे हार्मोन्सवर परिणाम होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा गोळ्यांचे सेवन केल्यास मासिक पाळीमध्ये अनियमितता येऊन ती बंद होण्याचे, तसेच प्रजननासंबंधित समस्या उद्भवण्याचा धोका असतो."
- डॉ. सीमा तुरस्कर, स्त्रीरोगतज्ज्ञ, भंडारा.