घरकुलासाठी जीव द्यायचा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 10:07 PM2018-07-01T22:07:47+5:302018-07-01T22:08:55+5:30
जुने घर पडलेले. कसाबसे रहाट समोर ढकलत जायचे. आता पावसाळा लागलाय. एकीकडे तुटके घर तर दुसऱ्या बाजूने निधीअभावी अर्धवट झालेले बांधकाम.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : जुने घर पडलेले. कसाबसे रहाट समोर ढकलत जायचे. आता पावसाळा लागलाय. एकीकडे तुटके घर तर दुसऱ्या बाजूने निधीअभावी अर्धवट झालेले बांधकाम. सातत्याने ‘ती’ वृद्धा गटविकास अधिकाऱ्यांच्या भेटीला येते. पण, तिला 'फुटबॉल' करून ग्रामपंचायतीकडे पाठविण्यात येते. गाव ते शहर असा वारंवार प्रवास करणारी ती विधवा महिला थकली आहे. अखेर निराश झालेल्या त्या महिलेने घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा, यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. तीन दिवसात हप्ता न मिळाल्यास पंचायत समितीसमोर आत्महत्या करण्याचा इशारा तिने दिला आहे.
निराश अन् हतबल झालेली ती विधवा वृद्धाचं नाव चंद्रभागा चव्हाण असे असून ग्रामपंचायत सिरसोली / कान्हळगाव येथे वास्तव्यास असते. घरकुलाचा हप्ता मिळावा, यासाठी आत्महत्या करण्यापर्यंत त्या विधवा व गरीब महिलेला निर्णय घ्यावा लागतो ही शोकांतिका म्हणावी लागेल. चंद्रभागा चव्हाण ही सिरसोली येथील दलित समाजाची गरीब महिला आहे. त्या महिलेला २०१७-१८ या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. घरकुल बांधकामासाठी अग्रीम प्रथम हप्ता ३० हजार रुपये दीड महिन्यांपूर्वी दिला गेला आहे. त्या निधीमुळे त्या महिलेने घरकुलाचे काम सुरु केले. दुसऱ्या हप्त्यासाठी आता पंचायत समिती मोहाडीच्या येरझाºया मारत आहे. पावसाळा आल्याने तीने उसणे रुपये घेवून पुढे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला तरी काम सज्जा पातळीपर्यंत ढकलत नेता आला. आता उसणे व हातातले सर्व पैसे संपले. त्यामुळे घरकुलांचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी तिने बांधकामाची फोटो काढली. पंचायत समितीला सादर केली. पण, हप्ता मिळण्यासाठी त्या वृद्धेला दमछाक करावी लागत आहे. घरकुल बांधकाम झालाय याबाबत ग्रामपंचायत कडून दाखला घेवून येण्यास पंचायत समितीकडून सांगण्यात आले. त्या महिला ग्रा.पं. चे सरपंच व सचिव यांच्याकडे दाखला घेण्यास गेले. मात्र वारंवार जावूनही ग्रामपंचायत सिरसोली कडून दाखला देण्यात आला नाही. याबाबत त्या महिलेने गटविकास अधिकारी मोहाडी यांच्याकडे तोंडी प्रसंगी लेखी फिर्याद सादर केली. अनेकदा प्रत्यक्ष भेटण्यासाठी बिडीओंची त्यांच्या दालनासमोर प्रतिक्षा केली. पण, त्या महिलेच्या हातात काही लागले नाही. अखेर निराश झालेल्या त्या महिलेने ३० जून रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांना निवेदन सादर केले. स्थानिक ग्रामपंचायतचे प्रशासन द्वेषभावनेने त्रास देत आहेत. तसेच त्यांच्या प्रभावाखाली येवून गटविकास अधिकारी काही कार्यवाही करीत नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदर प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनी न्याय तीन दिवसात द्यावा, पुढचा हप्ता द्यावा अन्यथा तीन दिवसानंतर पंचायत समिती मोहाडी समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक नसेल असा निर्वाणीचा इशारा निवेदनातून दिला गेला आहे. या निवेदनाची प्रत खासदार मधुकर कुकडे, जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांना दिली गेली आहे. त्या वृद्ध महिलेने दिलेल्या निवेदनामुळे पंचायत समिती मोहाडी येथे खळबळ सुरु झाली आहे.
सरपंच म्हणतात, रस्त्यावर बांधकाम
पंचायत समितीच्या प्रशासनात खळबळ निर्माण करणारी तेवढीच गंभीर बाब दिसून येत आहे. याबाबत सिरसोली / कान्हळगाव येथील सरपंच अंकुश दमाहे यांनी प्रतिक्रिया दिली. घरकुल मंजूर झाल्यानंतर सदर महिलेने बांधकाम करताना ग्रामपंचायतला माहिती दिली नाही. ग्रा.पं. ची परवानगीही घेतली नाही. घरकुलाचा काही भाग रस्त्यावर बांधण्यात आला आहे. सिमेंट रस्ता तोडून बांधकाम केला गेला. नाली तोडून सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या ठिकाणाहून सांडपाणी निघण्यास जागा उरली नाही. त्या बाजूला राहणाऱ्या लोाकंना जाण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत कडून मोका चौकशी केली. त्यात या बाबी आधीच आढळून आल्या होत्या.
घरकुलाचे बांधकाम केल्यासंबंधी लाभर्थिनी सरपंच / सचिवाचा दाखला सादर केला नाही. त्यामुळे दुसरा हप्ता दिला गेला नाही. संबंधित सरपंचांना दाखला देण्यासंबंधी माहिती दिली. दाखला प्राप्त होताच दुसरा हप्ता लगेच त्या महिलेच्या कँक खात्यात वळता केला जाईल.
-रविंद्र वंजारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मोहाडी.