‘त्या’ शासन निर्णयाविरुद्ध डॉक्टर एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:39 PM2018-09-09T21:39:10+5:302018-09-09T21:40:19+5:30
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमीत केले. या आदेशाने डॉक्टरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून सदर शासननिर्णय मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मा) मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी संबंधितांना निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमीत केले. या आदेशाने डॉक्टरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून सदर शासननिर्णय मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मा) मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी संबंधितांना निवेदन दिले आहे.
राज्य शासनाने १ सप्टेंबर रोजी शासननिर्णय घोषित केला. त्यानुसार आरोग्य केंद्रात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाला आणि डॉक्टर गैरहजर असेल तर त्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा शासननिर्णय मागे घ्यावा यासाठी सर्व डॉक्टर संघटना एकवटल्या आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ कमी आहे. अनेक ठिकाणी औषधसाठा आणि साधन सामुग्रीचा अभाव आहे. अशा परिस्थितीत अनेक डॉक्टर मन लावून रुग्णसेवा करतात. परंतु या शासननिर्णयाने त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार आहे. यासाठी हा शासननिर्णय मागे घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी मॅग्माचे अध्यक्ष डॉ.मधुकर कुंभरे, सचिव डॉ.शंकर कैकाडे, डॉ.प्रशांत उईके, कोषाध्यक्ष डॉ.सरिता मालडोंगरे, डॉ.विकास मेश्राम, डॉ.मिलिंद मोटघरे, डॉ.चंचल खोब्रागडे, डॉ.सुचिता वाघमारे, डॉ.त्रिशला वाढीवे, डॉ.संदीप गजभिये, डॉ.विरेंद्र कुकडे, डॉ.प्रकाश कुंभरे, डॉ.राकेश नंदेश्वर, डॉ.सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.