जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी मतदानापासून राहिले वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:44 AM2024-11-22T11:44:30+5:302024-11-22T11:45:56+5:30

अनेकांनी नमुना १२ फॉर्म भरलेच नाहीत : २१७ रुग्णही राहिले उपेक्षित

Doctors and employees of the district hospital remained deprived of voting | जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी मतदानापासून राहिले वंचित

Doctors and employees of the district hospital remained deprived of voting

युवराज गोमासे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील सामान्य रुग्णालयातील २१७ रुग्णांसह शेकडो डॉक्टर व कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. कानाकोपऱ्यातून राज्याच्या रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्यांनी पोस्टल मतदानासाठी नमुना १२ भरलेच नव्हते, ही बाबही प्रकर्षाने समोर आली. तसेच रुग्णालयात मतदान केंद्राचा अभाव होता. मतदानाचा टक्का घटण्यामागचे हेही एक कारण असल्याचे पुढे आले आहे.


भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भंडारा जिल्ह्यासह नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नाशिक, बुलढाणा, अहमदनगर, संभाजीनगर आदी शहरांसह अन्य शहरातील डॉक्टर व कर्मचारी सेवारत आहेत. मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात २८६ रुग्ण भरती होते. त्यापैकी २१७ रुग्ण १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. यामध्ये महिला व पुरुष रुग्णांचा समावेश होता. प्रशासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. मतदान केंद्रांची संख्या निर्धारित करण्यात आली.


दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आले. परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालयात मतदान केंद्र निर्माण करण्याचे किंवा त्यांचे मतदान नोंदविण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही, अशी खंत रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात आली. निदान रुग्णांचे मतदान घेण्यासाठी दिव्यांगांप्रमाणे सुविधा दिली असती तर मतदानाचा टक्का निश्चितच वाढण्यास मदत झाली असती, असे रुग्ण नातेवाइकांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील सेवारत शेकडो डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्रही पहावयास मिळाले. अनेकांनी पोस्टल मतदानासाठी नमुना १२ फॉर्म भरलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.


अन्य विभागाचे कर्मचारीही राहिले वंचित
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर व कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले नाही, तर जिल्हा शल्यचिकित्सकांनीही मतदान केले नसल्याचे उघड झाले आहे. तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचारी तसेच मतदान कार्यात नियुक्त कर्मचारी व अधिकारीही मतदानापासून वंचित राहिले.

Web Title: Doctors and employees of the district hospital remained deprived of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.