दस्तावेज प्रकरण मंत्रालयात
By admin | Published: December 29, 2014 11:36 PM2014-12-29T23:36:56+5:302014-12-29T23:36:56+5:30
महत्वपूर्ण दस्तावेज सुरक्षित असावे, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या कक्षात ‘स्टोअर रुम’ची निर्मिती केली. मात्र या ठिकाणच्या रंगरंगोटीचे काम रखडल्याने अद्यापही दस्तावेजांचे
जिल्हा परिषदेतील प्रकार : ‘स्टोअर रुम’ दस्तावेजाविना
देवानंद नंदेश्वर - भंडारा
महत्वपूर्ण दस्तावेज सुरक्षित असावे, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या कक्षात ‘स्टोअर रुम’ची निर्मिती केली. मात्र या ठिकाणच्या रंगरंगोटीचे काम रखडल्याने अद्यापही दस्तावेजांचे गठ्ठे महिला प्रसाधनगृहलगत आणि कर्मचाऱ्यांच्या टेबलाखाली ठेवण्यात आली आहेत. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘लोकमत’च्या वृत्ताची राज्याच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून वृत्ताची कात्रणे मंत्रालयात पाठविण्यात आल्याचे जिल्हा परिषद सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज असुरक्षित आहेत, या आशयाचे वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारला प्रकाशित केले. याचा धसका घेऊन आरोग्य विभागाने शनिवारी सुटीच्या दिवशी ‘स्टोअर रुम’च्या कामाला प्रारंभ केला. तसेच रविवारला व्हरांड्यातील अस्ताव्यस्त असलेल्या दस्तावेजांची उचल करून तेथील साफसफाई करण्यात आली होती.
आज, सोमवारला सदर प्रतिनिधीने जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षशेजारी असलेल्या महिला प्रसाधन गृहलगत दस्तावेजांचे गठ्ठे दिसून आले. व्हरांड्यातील एका कोपऱ्यातील गठ्ठे उघड्यावर असल्याचे दिसू नये, यासाठी निळ्या रंगाचा पडदा लावण्यात आला आहे. त्याशेजारी आरोग्य विभागाचे कागदपत्रे असलेली एक रॅक दिसून आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या कक्षात असलेल्या ‘स्टोअर रुम’च्या रंगरंगोटीचे काम रखडल्याने कर्मचाऱ्यांच्या टेबलाखाली दस्तावेजाचे गठ्ठे ठेवण्यात आली आहेत.
या कक्षात अधिकारी, कर्मचारी कामात व्यस्त दिसून आले. कर्मचारी आसनस्थ असलेल्या मागील बाजुला 'स्टोअर रुम' आहे. येथे दस्तावेज ठेवण्यासाठी असलेल्या कपाटांना गंज दिसून आला. लवकरच त्याची रंगरंगोटी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.