संस्कृती संवर्धन व सामाजिक एकतेसाठी बाहुल्यांचे लग्न

By Admin | Published: May 29, 2017 12:19 AM2017-05-29T00:19:02+5:302017-05-29T00:19:02+5:30

अलिकडे मुली बालपणीचा भातुकलीचा खेळ विसरत चालला आहे. पण, सिरसोली (कान्हळगाव) या खेड्यातील महिलांनी बाहुला-बाहुलीचा खेळाची नाळ टिकवून ठेवली आहे.

Dolls wedding for culture conservation and social unity | संस्कृती संवर्धन व सामाजिक एकतेसाठी बाहुल्यांचे लग्न

संस्कृती संवर्धन व सामाजिक एकतेसाठी बाहुल्यांचे लग्न

googlenewsNext

सिरसोली येथे दहा वर्षांची परंपरा कायम : महिलांचा पुढाकाराने झाले एकतेचे दर्शन
राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : अलिकडे मुली बालपणीचा भातुकलीचा खेळ विसरत चालला आहे. पण, सिरसोली (कान्हळगाव) या खेड्यातील महिलांनी बाहुला-बाहुलीचा खेळाची नाळ टिकवून ठेवली आहे. आपल्या परंपरेचे जतन अन् संस्कृती संवर्धनासाठी मागील दहा वर्षापासून भातुकलीच्या खेळाचा वारसा महिला चालवित आहेत.
बाहुला-बाहुलींचा लग्न हा लहानग्यांचा बालपणातील सर्वात आवडता खेळ. प्रत्येक मुलगी बालपणी हा खेळ खेळायची. बालपणातील छोट्या भांड्यात तयार होणारे जेवण, हिरव्या पानाच्या चपात्या, वरण आदी पदार्थ तयार करणे, शिंप्याच्या घरुन आणलेल्या नवीन उपयोगहीन कापड्यांचे छोटेछोटे तुकडे. त्या तुकड्यांनी तयार केलेली बाहुला-बाहुली. त्यांच लग्न, जेवन. करंजीच्या पानाची सनई, फुटलेल्या माठाच्या वरच्या भागावर चिक्कीने कागद लावून बनलेला डफ... एकूणच भातुकलीच्या खेळात लहान मुली-मुलांची मज्जा असायची. पण, त्या खेळातील आपुलकी, सर्वांना सामावून घेत खेळ खेळण्याची मज्जा त्या आठवणी सिरसोली (कान्हळगाव) येथील कुसूमबाई गाढवे यांनी मागील दहा वर्षापासून ताज्या ठेवल्या आहेत. तिच्यासह सुनिता पटले, सरीता सव्वालाखे, तारा गाढवे, वच्छला बावणे, कलावती मते, शालिनी दमाहे, सैनाज कुरेशी, कर्मशाला फुलेकर, निशा गाढवे, राजकुमारी कस्तुरे, रेखा गाढवे, प्रमिला शहारे, सुमन लिल्हारे, रिना दमाहे या महिलांच्या सहकार्याने भातुकली खेळाची पंरपरा पुढे जात आहे.
अगदी हुबेहूब वाटावा असा बाहुलाबाहुलीचा लग्न पारंपारिक पध्दतीने व थाटात साजरा केला गेला. गावात मुला-मुलींचे लग्न सोहळे आटोपल्यानंतर भातुकलीच्या खेळाचा मुहूर्त काढला जातो. गावातील आनंदी वातावरण तसाच राहावा, गावात सर्व जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र यावे, गावात एकतेचे दर्शन व्हावे किंबहुना खरीप हंगामाच्या पूर्वी मनोरंजन करावे हा हेतू समोर ठेवून कार्यक्रम साजरा केला जातो. बाहुल्यांच्या लग्नकार्य समांरभासाठी गावातून लोकवर्गणी गोळा केली जाते. तांदूळ, गहू, डाळ धान्यही जमविला जातो. यानंतर जे काही कमी जाते त्याच्यात कुसूमबाई पदरातील रूपया लावते. यावर्षीही तीन दिवस बाहुल्यांचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
आज जयश्री (बाहुली) व गणपत (बाहुला) हे आज विवाहबध्द झाले. या दोघांच्या लग्नाची पत्रिका छापली. उद्या रेखाबाई व चंद्रशेखर मोघरे यांच्या घरी स्वागत समारोह गावकऱ्यांसाठी सुरूचीभोज ठेवण्यात आला आहे. या लग्नात अहेर ही घेतला गेला. बॅन्डच्या तालावर निघालेली बाहुल्यांची वरात, नाचणारे वऱ्हाडी, फटाक्यांची आतिषबाजी, पाहुण्यांचे स्वागत, शुभमंगल म्हणताच अक्षता टाकूण विवाहावर शिक्कामोर्तब करणारी वऱ्हाडी मंडळी लग्नात खरेपणा आणला होता.
ग्रामीण भागातील लग्नातील सर्व नेंगमोरे या भातुकलीच्या लग्नात केले गेले एकुणच काय कन्यादानही केले गेले. असा हा आगळावेगळा बाहुला बाहुलींचा लग्न गावकऱ्यांसाठी पर्वणी ठरला. गावात हिंदू, बौध्द, मुस्लीम या सर्वधर्मियांनी नुसता सक्रिय सहभाग नव्हे तर प्रत्येक कामात हातभार लावून गावातील एकात्मता मजबूत केली आहे.
गावातील कर्तीमंडळी या लोक संस्कृतीला जपण्यासाठी महिलांना पाठबळ देत आहेत. तसा हा खेळ आषाढीच्या आदल्या दिवशी ग्रामीण भागात खेळला जातो. बाहुल्यांचे लग्न लावून दुसऱ्या दिवशी वाजत गाजत वरात काढण्याची प्रथा लोप पावत आहे. बाहुल्यांचा म्हणजे भातुकलीचा उत्सव आता लोप पावत आहे. पूर्वीची मजा, आपुलकी आता नाहीशी होत आहे. मुली आता मॉड्युलर किचनमध्ये रमताना दिसतात. पण सिरसोली या खेड्यातील महिला येणाऱ्या पिढीतील मुलींना संस्कार देण्याचा किंबहूना ग्रामीण संस्कृती टिकविण्याचे धडे देत आहेत.

Web Title: Dolls wedding for culture conservation and social unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.