घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:07+5:302021-07-04T04:24:07+5:30

सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२५ रुपयांची भाववाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने ...

Domestic gas cylinder goes up by Rs 25 again | घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागला !

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागला !

Next

सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२५ रुपयांची भाववाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असताना त्यावरील सबसिडीत मात्र कपात केली जात आहे. गॅस सिलिंडरधारकांना ३० ते ४० रुपयांची सबसिडी दिली आहे. वाढत्या किमतींमुळे गृहिणींचीसुद्धा महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलीच दमछाक होत आहे. कोरोना संकटात ही दरवाढ नागरिकांच्या मानगुटीवर बसत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नसून संताप व्यक्त होत आहे.

‘वाढत्या महागाईमुळे जगायचे कसे तुम्हीच सांगा,’ असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

घरखर्च भागवायचा कसा?

कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता ९०० रुपये मोजावे लागत आहेत; यामुळे महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच दमछाक होत आहे. - प्रियंका सार्वे, गृहिणी

वाढत्या महागाईमुळे आधीच गृहिणींचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. उत्पन्न स्थिर असून महागाईत मात्र सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने किमान गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे. - मनीषा वासनिक, गृहिणी

फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी वाढ

यंदा फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल ११० रुपयांनी वाढल्याने ६६४ रुपयांच्या सिलिंडरसाठी तब्बल ७६९ रुपये मोजावे लागले आहेत. त्यानंतरही दरवाढ कायम असल्याने अनेकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने लक्ष द्यावे

जीवनावश्यक वस्तू गणल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सिलिंडर्सची वाढती मागणी लक्षात घेता देशातसुद्धा त्याचा फटका बसत आहे. अलीकडेच कोरोना संकटकाळ दूर होत असताना इंधन दरवाढीसह गॅस सिलिंडर्सच्या किमती वाढल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक बिघडले आहे. ही दरवाढ ऑक्टोबर महिन्यापर्यंत दुपटीने होणार तर नाही ना, अशी भीती आता सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. दरवाढीचा निषेध म्हणून दररोज विविध संघटना, पक्ष आंदोलने करीत आहेत. असे असतानाही केंद्र सरकार गॅस सिलिंडर्सच्या किमती कमी करण्यास हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.

Web Title: Domestic gas cylinder goes up by Rs 25 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.