रब्बीत हरभरा पिकाचा बोलबाला; गहू दुसऱ्या स्थानावर

By युवराज गोमास | Published: November 21, 2023 05:15 PM2023-11-21T17:15:49+5:302023-11-21T17:18:00+5:30

गहू, हरभरा पेरणीला पसंती : सिंचन क्षमतेनुसार पिकांची लागवड

Dominance of Rabbit Gram Crop; Wheat is second | रब्बीत हरभरा पिकाचा बोलबाला; गहू दुसऱ्या स्थानावर

रब्बीत हरभरा पिकाचा बोलबाला; गहू दुसऱ्या स्थानावर

भंडारा : गतवर्षाप्रमाणे यंदाही रब्बीत हरभरा पिकाचा बोलबाला राहणार आहे. हरभरा पिकाची १७,५६८ हेक्टरवर लागवड होणार आहे. तर दुसऱ्या स्थानावर गहू पिकाची लागवड होणार असून गव्हाचे लागवड क्षेत्र १०७०४ हेक्टर राहणार आहे. यंदा जिल्ह्यात एकूण १ लाख ३३ हजार ४०४ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्यातही गतवर्षीप्रमाणे यंदाही हरभरा, गहू, मका, लाख-लाखोळी, तृणधान्य, वाटाणा, उडीद, मूग आदी पिकांची सर्वाधिक लागवड होण्याचा अंदाज आहे.

भंडारा जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर आहे. त्यातही पीक लागवडी योग्य क्षेत्र २ लाख ७ हजार २८७ हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ३३ हजार ४०४ हेक्टरवर विविध रब्बी पिकांची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कृषी विभागाने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खत व बियाणे पुरवठ्यात कुठलीही अडचण भासू नये, यासाठी विशेष नियोजन केले आहे. गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. तर यंदा मात्र पावसाने जेमतेम सरासरी गाठली. खरीप हंगात आता अंतीम टप्प्यात आहे. कापणी व मळणी जाेमात आहे. त्यासोबत रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी शेतात राबतांना दिसत आहेत.

९५४६ क्विंटल बियाण्याची मागणी

भंडारा कृषी विभागाने गतवर्षाचा अंदाज लक्षात घेता ९५४६ क्विंटल गहू व हरभरा बियाण्यांची मागणी केली आहे. गहू ४४७४ क्विंटल तर हरभरा ५०५२ क्विंटलचा समावेश आहे. गतवर्षी ३२५१ क्विंटल गहू व हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. पुरवठा झालेल्यामध्ये गहू ४६१ तर हरभरा २७९० क्विंटलचा समावेश होता.

५१३५० मेट्रीक टन खतांची मागणी

रब्बीचा हंगाम लक्षात घेता कृषी विभाग सजग दिसत आहे. बियाण्यांच्या नियोजनासोबत पर्याप्त खताच्या मात्रांचे नियोजनही करण्यात आले आहे. यंदा युरीया, डीएपी, एसएसपी, एसओपी आदी ५१३५० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. सन २०२२-२३ या हंगामासाठी ५३०५५ मेट्रीक टन मागणी करण्यात आली होती. तर सुमारे ६१०८८ मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला होता.

Web Title: Dominance of Rabbit Gram Crop; Wheat is second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.