गोलेवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डोंगरगावात स्मशानभूमीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:04 PM2024-08-14T13:04:23+5:302024-08-14T13:05:00+5:30

Bhandara : पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यविधी करताना गावकऱ्यांना करावा लागतो नानाविध संकटांचा सामना

Dongargaon, which comes under Golewadi Group Gram Panchayat, has no crematorium! | गोलेवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डोंगरगावात स्मशानभूमीच नाही!

Dongargaon, which comes under Golewadi Group Gram Panchayat, has no crematorium!

अमोल ठवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पहेला :
स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षांचा कालावधी लोटला तरी गावात शासनाच्या योजनांचा उपयोग होताना दिसत नाही. जवळच असलेल्या गोलेवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला डोंगरगाव येथील लोकसंख्या २५० च्या जवळपास आहे. या गावाला स्वतःची स्मशानभूमी नाही. त्यापैकीच एक गाव म्हणजेच डोंगरगाव. इथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला जागा शोधावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यविधी करताना नानाविध संकटांना समोर जावे लागत आहे.


इथे कविवर्य सुरेश भट्ट यांची कविता आठवतेय.. 'इतकेच मला सरणावर जाताना कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' डोंगरगाव हे गाव राज्यमार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. परंतु अद्याप स्मशानभूमीची जागा नाही. गोलेवाडी ग्रामपंचायतीतर्फे नियोजित सरकारी जागा गट क्रमांक सातची जागा नियोजित केली. परंतु या जागेकडे जाण्यासाठी मार्गच नाही.


आजूबाजूला शेतकऱ्यांचे शेत आहे. त्यामुळे डोंगरगाव नागरिक जिथे जमेल तिथे नाल्याच्या ठिकाणी अंत्यसंस्काराची विधी पार पाडतात. मागील दहा वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार हे डोंगरगाव आणि गोलेवाडी शिवारातील नाल्यावरच होत होते. परंतु याला गोलीवाडीतील नागरिकांनी विरोध दाखविला. शासनाकडे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाठपुरावा केला. मरणानंतरचा मार्ग खडतर असल्याचे गावकरी बोलून दाखवतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठेच अंत्यसंस्कारासाठी शेड नाही, पाणी नाही.


अंत्यविधीसाठी पाऊस उघडेपर्यंत वाट बघावी लागते. नाल्याच्या ठिकाणी जावे म्हटले तर एक किलोमीटरचे अंतर गाठावे लागते. त्या ठिकाणचा नाला हा उसळणी भरून वाहत असतो. डोंगरगाव गावालगत हक्काची जागा नसल्याने शासनाच्या दुर्लक्षितपणाचा कळसच म्हणावा लागेल. शासनाने या गावाला हक्काची स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून सोयी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी आहे.


"ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून तिथे येण्या-जाण्याचा मार्ग उपलब्ध करावा. तोपर्यंत किमान नाल्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सुविधा पुरवावी."
- गुरुदेव चामट, माजी उपसरपंच, डोंगरगाव

Web Title: Dongargaon, which comes under Golewadi Group Gram Panchayat, has no crematorium!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.