दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:59+5:302021-05-06T04:37:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लस घेण्याचा एक टाइमफ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लस घेण्याचा एक टाइमफ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका, अशी बाब वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लक्ष १७ हजार ११८ व्यक्तींना प्रथम व द्वितीय डोस देण्यात आला आहे.
डोस देण्यात आलेल्यांमध्ये आरोग्य सेवक १४,५९४, फ्रंटलाइन वर्कर १३,७३५, तसेच १८ ते ४४ व ४५ वयोगटावरील व्यक्ती व वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची चर्चा व तशी स्थितीही दिसून येत असल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण जाणार काय, असे वाटत आहे. दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तर घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असेच तज्ज्ञ व्यक्ती सांगत आहेत. कोरोना महामारी थांबविण्यासाठी व्हॅक्सिन एक मोठे शस्त्र म्हणून समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येकच व्यक्तीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊन येणाऱ्या लाटेसाठीही आपण सज्ज होऊ शकतो किंबहुना पहिल्याच लसीकरणांतर्गत अजूनही बहुतांश नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही.
उल्लेखनीय म्हणजे भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६१६१ वरिष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. मात्र, अजूनही ४५ वयोगटावरील व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
बॉक्स
दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा
लसीचा दुसरा डोस मिळाला नाही, तर कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. टप्प्याटप्प्याने व उपलब्ध साठ्यानुसार सर्वांनाच लसीकरणाचा दुसरा डोस मिळणार आहे. एका डोसनंतर बराच उशीर झाला, अशी वायफळ चिंताही करू नये, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.
कोट बॉक्स
‘हर्ड इम्युनिटी’ सार्वजनिक होईल
दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एखाद्या व्यक्तीने पहिला डोस घेतला असेल व त्यानंतर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असेल तर घाबरण्याचे कारण नाही. कोरोनामुक्त बरा झाल्यावर किमान सहा आठवड्यांनंतर लसीकरणाचा दुसरा डोस घेता येतो. याशिवाय नॉर्मल व्यक्तीला दुसरा डोस घेण्यासाठी उशीर झाला असेल तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एक किंवा दोन आठवडे उशीर झाला तर शरीरात कुठलाही बदल होत नाही. पहिल्या लसीकरणानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडीज आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात किंबहुना येणाऱ्या दिवसांत ‘हर्ड इम्युनिटी’ प्रकार सार्वजनिक झालेला असेल.
- डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा.