ज्योतिषशास्त्र विषय सुरू करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:14+5:302021-08-21T04:40:14+5:30
महाराष्टाला संतांची आणि समाजसुधारकांची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे.आपल्या भूमीचा बुद्धांचा देश असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामीपासून ...
महाराष्टाला संतांची आणि समाजसुधारकांची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे.आपल्या भूमीचा बुद्धांचा देश असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामीपासून ते थेट संत गाडगेबाबा महाराजांपर्यंत प्रबोधनाची परंपरा आहे. तर दुसऱ्या बाजूला महात्मा फुले पासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत समाजसुधारक होऊन गेले. त्यांची परंपरा चालू ठेवणे हे प्रत्येक महाराष्ट्रातील सुज्ञ लोकांचे कर्तव्य आहे. अशा वेळी इगणुतर्फे या वर्षांपासून ज्योतिषशास्त्र या विषयात पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे.
स्वामी विवेकानंद व स्वातंत्रवीर सावरकर यांनीही ज्योतिषशास्त्राला कडाडून विरोध केला आहे. ज्योतिषशास्त्र हा अभ्यासक्रम शिकून महाराष्ट्रामध्ये कर्मकांड करणारे, आपला वेळ, पैसा व श्रम वाया घालविणारे युवक तयार होतील. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबविण्यासाठी शासन-प्रशासनाने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांना ज्योतिषशास्त्र या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये. अशी मागणी निवेदनातून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तुमसरचे तालुका संघटक राहुल डोंगरे, सचिव विजय केवट, कार्याध्यक्ष वासू चरडे, उपाध्यक्ष राजूभाऊ चामट ,सल्लागार अनिल भुसारी यांनी केली आहे.