शेतकरी नवरा नको गं बाई! कारभारीण मिळणे झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 11:19 AM2024-11-16T11:19:25+5:302024-11-16T11:21:02+5:30
तुळशी लग्न आटोपले, आता विवाह सोहळ्यांची धूम : नोकरी व व्यावसायिकांना प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह आटोपताच लग्नसोहळे सुरू होणार आहेत. उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला आहे; परंतु या सर्व भानगडी शेतकरी व त्यांची मुले मात्र कायमच उपेक्षित असल्याचे चित्र यंदाही पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना व व्यावसायिकांना प्राधान्य दिले जात असल्याने यंदाही शेतकऱ्यांना कारभारीण मिळणे कठीण जाणार आहे.
अलीकडे जोडीदार निवडताना मुलींना शेती हवी, जमीन हवी; मात्र शेतकरी नवरा नको आहे. त्यामुळे सामाजिक समस्यांची जटिलता वाढली आहे. शिकलेल्या मुली व त्यांचे पालक आपल्या मुलींसाठी शिकलेला व सरकारी नोकरी व घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. खासगी नोकरी आणि सध्या कमी पगार असला तरी चालेलः पण तो शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. जन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार, तर कनिष्ठ नोकरी समजली जायची. आता मात्र उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात आहे
अलीकडे मुलींच्या वाढल्या अपेक्षा
अलीकडे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उच्चशिक्षित, निर्व्यसनी, घरंदाज, कमविता वर मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. यामुळे शेतकरी, शेतमजूर वरांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मुलांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षण-नोकरी-व्यवसायात स्वतःला सिद्ध करताना घाम गाळावा लागत आहे.
वधूंसाठी दोन्हीकडील खर्चाची तयारी
गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले उपवर तरुण व त्यांचे कुटुंबीय 'यंदा कर्तव्य आहे' म्हणून 'एखादी मुलगी पाहा हो असा सूर आळवत आहेत. वधू-वर संशोधन केंद्रातही आता 'वधू पाहिजे' साठी नवरदेवांची नोंदणी वाढली आहे. त्यातच आता वराकडील मंडळी दोन्ही बाजूंचा खर्च करण्याची तयारी दर्शवीत आहेत.
राजकीय उदासीनतेचा शेतकऱ्यांना फटका
पूर्वी शेतीला प्रतिष्ठा होती; परंतू आता शेती व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या वडिलांचे काबाडकष्ट व शेतीची वाताहत डोळ्यांनी बघितलेली असते. त्यामुळेच मुलींनाच शेतकरी नवरा नको आहे. ही सामाजिक समस्या निर्माण होण्यास राजकीय उदासीनता व दुर्लक्ष तेवढेच कारणीभूत आहे.
मुलींची घटती संख्याही कारणीभूत
आजही मुलांपेक्षा मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण कमी आहे. त्यातच ग्रामीण भागात मुलांपेक्षा मुलींचा शिक्षणाकडे अधिक कल आहे. मुलांपेक्षा मुली उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे कमी शिकलेला मुलगा त्यांच्या पसंतीस उतरत नाही. परिणामी, उपवर-वधूसाठी नवरदेवाकडील मंडळींना वधुसंशोधन करावे लागत आहे. पूर्वी वरपित्याच्या घराचे उंबरठे झिजवावे लागत असे. आता उलट चित्र निर्माण झाले आहे.