डीपीडीसीचाठरला ‘फार्म्युला’
By admin | Published: August 17, 2016 12:11 AM2016-08-17T00:11:28+5:302016-08-17T00:11:28+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका जिल्हा नियोजन समितीची असते.
२० जागांसाठी निवडणूक : काँग्रेस आठ, राष्ट्रवादी सात तर भाजपला पाच जागा
प्रशांत देसाई भंडारा
जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका जिल्हा नियोजन समितीची असते. मागील दोन वर्षांपासून सदस्य निवडीच्या गुंत्यावर तोडगा निघालेला नाही. मात्र, आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून यात जिल्हा परिषद सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी भाजपला यात समाविष्ट केले आहे. सत्ताधाऱ्यांनी जागा वाटपाचा फार्मूला तयार केला असला तरी, भाजपाला दिलेल्या जागांपैकी महिलांऐवजी पुरूषांची सदस्य संख्या जास्त हवी असल्याने राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष व नामनिर्देशित सदस्य निवडीसाठी शासनाकडे यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पालकमंत्री यांनी शिफारस केलेल्या नावांवर आक्षेप घेण्यात आला होता.
त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून रखडली आहे. दरम्यान जिल्हा परिषदमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक घेतली नाही व पदाधिकाऱ्यांना यापासाून वंचित रहावे लागत असल्याने नियोजन समिती गठीत करावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने निवडणूक घेण्याचे निर्देश शासनाला दिले. त्यानुसार आजपासून जिल्हा नियोजन समितीची निवडणूक घेण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे.
२२ सप्टेंबरला होवू घातलेली ही निवडणूक निर्विरोध व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहे. त्यानुसार २० सदस्यीय समितीसाठी काँग्रेस आठ व राष्ट्रवादी काँग्रेस सात अशा १५ जागा तर भाजपला पाच जागांचा फार्मूला तयार करण्यात आलेला आहे.
५० टक्के आरक्षणानुसार २० पैकी ११ जागा महिलांसाठी तर नऊ जागा पुरूषांसाठी सोडण्यात येणार आहे. जागा वाटपाचा तिढा वाढला असून भाजप सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या फार्मूल्यावर तयार नाही. तर सत्ताधारीही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने जागा वाटपाच्या फार्मूल्यावर आता कलगीतुरा रंगला आहे.
असा आहे जागांचा तिढा
यात काँग्रेसला आठ जागा असून त्यातील प्रत्येकी चार जागा महिला व पुरूष सदस्यांना समानसंधी मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळणार असून त्यात चार जागांवर महिला तर तीन जागांवर पुरूष सदस्यांना संधी मिळणार आहे. भाजपला देवू केलेल्या पाच जागांमध्ये तीन जागा महिलांसाठी तर दोन जागा पुरूषांसाठी देण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी दिला आहे. भाजपने यावर आक्षेप नोंदविला असून त्यांना चार जागा पुरूषांसाठी तर एक जागा महिलेसाठी हवी आहे. भाजपला पुरूष सदस्यांची संख्या वाढवून दिली तर, समितीवर महिलांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या मागणीवर तयार नाहीत.
जागांचे आरक्षण याप्रमाणे
जिल्हा नियोजन समितीच्या २० जागांपैकी तीन जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून त्यातील दोन महिला व एक पुरूषासाठी आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा असून ती महिलेसाठी राखीव आहे. सहा जागा नामाप्रसाठी असून त्यातील प्रत्येकी तीन जागा महिला व पुरूषांसाठी आहे. तर खूल्या प्रवर्गासाठी १० जागा असून त्यात प्रत्येकी पाच जागा महिला व पुरूषांसाठी आरक्षीत आहेत.
२० जागांसाठी निवडणूक होत असली तरी ती अविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न आहे. भाजपमध्ये नाराजी नाही. जागांचा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी सत्ताधारी व विरोधी गटाचे नेत्यांसोबत बैठक घेवून तोडगा काढू. सत्तेत सहभागी सदस्यांनाही स्थान देण्यात येईल.
- राजेश डोंगरे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.