विकासकामात लोकप्रतिनिधीचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:09 PM2018-02-27T23:09:58+5:302018-02-27T23:09:58+5:30
मोहाडी तालुक्यातील सातोना या गावात विकासकामे व्हावी यासाठी तर ताडगाव या गावात मंजूर कामे आधी नंतरच नवीन कामे करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मोहाडी तालुक्यातील सातोना या गावात विकासकामे व्हावी यासाठी तर ताडगाव या गावात मंजूर कामे आधी नंतरच नवीन कामे करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याचा आरोप सातोना व ताडगावच्या सरपंचांनी आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत केला आहे.
सातोना येथे मग्रारोहयो अंतर्गत ग्रामसबलीकरण योजनेत स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार ग्रामसभेने घेतलेल्या ठरावाला मोहाडी पंचायत समितीची सुद्धा मंजुरी आहे. त्यानुसार तांत्रिक अभियंताकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामाला शाखा अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरी दिली. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली नाही. त्यामुळे त्यांना विचारले असता टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलावून मोहाडीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. मात्र अद्यापपावेतो त्यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली नसल्याचा आरोप सरपंच नलिनी राजेश हटवार यांनी केला आहे. ग्रामसभेच्या ठरावाला दुर्लक्षित केल्यामुळे ग्रामपंचायतचे अधिकार हिरावल्याप्रकरणी गटविकास अधिकाºयांविरूद्ध कारवाई करण्याची मागणीही हटवार यांनी केली आहे.
भंडारा : ताडगाव ग्रामपंचायतीत सन २०१६-१७ मध्ये मग्रारोहयो अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यापूर्वीचे विविध ३० कामे मंजूर असूनही ही कामे अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. परंतु सिमेंट रस्त्याचे कामावर नजर ठेऊन राजकीय पदाधिकाऱ्यांशी जवळीक साधून सरपंचांच्या स्वाक्षरीशिवाय पंचायत समितीमधून रस्त्याचे कामे करण्यात येत असल्याचा आरोप ताडगावचे प्रभारी सरपंच शिवशंकर गायधने यांनी केला आहे.
यावेळी ते म्हणाले, मोहाडी पंचायत समितीमधून या कामाचे मस्टर काढून सरपंच, सदस्यांना याची माहिती न होऊ देता सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. नियमानुसार मस्टर वितरीत करण्याकरिता व मस्टर सादर करण्याकरिता सरपंचाची स्वाक्षरी अनिवार्य आहे. मग्रारोहयो अंतर्गतची कामे ग्रामपंचायतीमार्फत करावयाची असून या कामासंदर्भात ग्रामपंचायतीने काहीही कारवाई न करता ७५ टक्के केले आहे. परंतु यापूर्वीच्या मंजूर ३० कामाकरिता मोहाडीच्या खंडविकास अधिकाऱ्यांनी मस्टर वितरित केले नाही. यात लोकप्रतिनिधीच्या दबावाने सिमेंट रस्त्याचे काम करण्यात येत आहे. याप्रकरणाची जिल्हा प्रशासनाने चौकशी करून ग्रामपंचायतचे अधिकार कायम ठेवण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.