नाली बनली, पण पाणी जागचे हलेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:55+5:302021-06-22T04:23:55+5:30
अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ...
अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ज्या येथील ग्रामपंचायत प्रशासन सोडवू शकले तर नाहीच, पण समस्या दिवसागणिक वाढतच चालल्याने आता ग्रामस्थ मात्र संताप व्यक्त करीत आहेत. येथे नाली बनली, पण पाणी जागच्या जागी असल्याने आरोग्याचा प्रश्न उदभवू शकतो.
ग्रामपंचायत प्रशासनसुध्दा गावातील तथा येथील एकामागून एक वाढणाऱ्या समस्यांमुळेसुध्दा हतबल झाल्यासारखे वाटत आहे. अशोकनगराला लागून असलेल्या नाल्या आता मोठ्या प्रमाणात तुडुंब भरलेल्या स्थितीत आहेत. यासाठी कुणी काय करायचे, कसे बोलायचे आणि कुणाला बोलायचे, ही एक डोकेदुखीच झाली आहे. अशोकनगरातील पाणी नाल्या असूनसुद्धा पुरेसा निघत नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपली, कंत्राटदार आपली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ग्रामस्थसुध्दा आपली बाजू मांडून मोकळे होताना दिसत आहेत. सांडपाणी वाहून जाण्यासाठी जोपर्यंत मार्ग मोकळा किंवा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत पाणी जिथल्या तिथेच राहणार असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
आज जे कच्च्या नालीत साचलेले सांडपाणी आहे, ते याआधी कुठून जायचे कुठे? नाल्यांची कामे जेव्हापासून सुरू झालीत तेव्हा सुरुवातीला रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील एका सदस्याने मोठी हिम्मत करून सरळ सरळ जेसीबीच्या साहाय्याने एक नालीच केली आणि जोपर्यंत पुढे नाली होत नाही, तोपर्यंत हे पाणी बोळीत जाणार, असेही त्यांनी बोलले. पण पाणीसुद्धा जागचे हलले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे नियमानुसार जिथून पाणी जिथं जाणार होते, तो मार्ग का बंद करण्यात आला. ज्या मार्गाने जाणारे सांडपाणी तोही मार्ग जर मोकळा होत नसेल आणि अर्धवट नाल्यांचे बांधकामही पूर्ण होत नाही.
ग्रामस्थांच्या घरात, दुकानात हे सांडपाणी भरायचे का, असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे. राजेंद्र ब्राह्मणकर
यांच्या मते ज्या ठिकाणी आधी पाणी जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग होता, तोच झाला नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
रायभान सामृतवात म्हणाले, आता ज्या ठिकाणावरून पाणी बोळीत घातले जाणार तो प्रकार म्हणजे ‘वरणीचा पाणी आडयावर नेण्यासारखा आहे’. यासंदर्भात सरपंच जयश्री कुंभलकर म्हणाल्या, ग्रामपंचायत अडयाळ
येथील निर्माण झालेली समस्या येत्या काही दिवसांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.