धास्ती, तणाव अन् धावपळ....

By admin | Published: November 10, 2016 12:42 AM2016-11-10T00:42:37+5:302016-11-10T00:42:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशातील चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली.

Dread, tension and running .... | धास्ती, तणाव अन् धावपळ....

धास्ती, तणाव अन् धावपळ....

Next

५००, १००० च्या नोटा बंदचा फटका : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नोटा घेण्यास व्यापाऱ्यांचीही नकारघंटा
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशातील चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्याऐवजी २००० रुपयांची नोट चलनात आणत असल्याचे सांगितले. यामुळे देशात उमटलेले पडसाद जिल्ह्यातील नागरिकांमध्येही उमटल्या आहेत. अनेकांनी रात्री उशिरापर्यंत एटीएम केंद्रावर जाऊन नोटा बदलविण्याचा प्रयत्न किंवा खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून व्यापाऱ्यांनीही नोटा घेण्यासाठी नकार दर्शविल्यामुळे खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.

काळा पैसा जमा केलेल्या धनदांगड्यांसाठी पंतप्रधान मोदी यांनी हा प्रयोग केल्याची चर्चा आहे. दरम्यान काल अचानकपणे केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन देशाच्या चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही बाब नागरिकांना माहित होताच, देशातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. याचा धसका भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनीही घेतला.
अनेकांनी तर रात्रीलाच एटीएम केंद्रावर गर्दी करून घरी असलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरातील अनेक एटीएम केंद्राबाहेर बोचऱ्या थंडीतही नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली.
अनेकांच्या घरात मोठी रक्कम असल्याने मोदींच्या घोषणेनंतर त्यांची झोप उडाली आहे. आज अनेकांनी त्यांच्याकडील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी बँकेकडे धाव घेतली. मात्र, बँकेंचा आर्थिक व्यवहार आज दिवसभर बंद होता. त्यामुळे अनेकांनी स्वत:जवळ आणलेली रक्कम परत नेली. नोटा चलनातून बंद करण्यात आल्याने अनेकांनी मागील अनेक दिवसांपासून घरात किंवा गुप्त ठिकाणी ठेवलेली रक्कम आज बाहेर काढली. आता या रक्कमेची कशी विल्हेवाट लावायची या विवंचनेत नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य कोमेजले. (शहर प्रतिनिधी)

एलआयसीनेही केले हात ‘वर’
देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या भारतीय जीवन विमा निगमनेही आजच्या या परिस्थितीत त्यांच्या विमाधारकांना साथ दिली नाही. ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी’ं म्हणणाऱ्या एलआयसीने अशी साथ न दिल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली. एरव्ही ५०० व १००० रुपयांच्या नोटा बिनदिक्कत स्वीकारणाऱ्या भंडारा येथील एलआयसीच्या शाखेच्या प्रवेशद्वारावर ५०० व १००० रुपयांची नोट स्वीकारणार नसल्याची ाूचना नोटीस बोर्डवर लावण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण विम्याचे हप्ते भरण्यासाठी आले असता त्यांना आल्यापावली परतावे लागले.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या एलआयसीने हातवर केल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला. चलनातून नोटा बंद झाल्याने आज दिवसभर धनादेशातून विमा रक्कम स्वीकारली. यामुळे एलआयसीच्या तिजोरीत आज ९० टक्के रोख रक्कम कमी झाली. बहुतांश व्यवहार हा रोखीने होत असल्याची माहिती शाखाप्रमुखाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सावकारही हिरमुसले
भंडारा जिल्ह्यात सावकारी करणारे अधिकृत परवानाधारकांची संख्या जितकी आहे, त्यापेक्षा अनेकपटीने अधिक प्रमाणात सावकारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सावकारी करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांसह राजकीय पक्षांशी जुळलेल्या व्यक्तीही जुळलेल्या आहेत. भंडारा शहरात अशांची यादी मोठी असून अनेकांचे कोट्यवधी, तर अनेकांचे ५० लाखांहून अधिक रक्कम मार्केटमध्ये आहे. ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांचे चलन बंद करण्याच्या घोषणेमुळे या सावकारांचे चेहरे चांगलेच हिरमुसले आहेत. ज्यांनी व्याजरूपाने कर्ज घेतले आहे, त्यांनी हे पैसे देण्यासाठी नकार दिला तर त्यांच्याविरूद्ध पोलीस तक्रारही करता येऊ शकत नाही. हा व्यवहार आपसी झाल्यामुळे पैसे परत मिळतील याची त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे आपले कसे होईल, या चिंतेने सावकारांना ग्रासले आहे.
बाजारपेठेत शुकशुकाट
सध्या दिवाळीचे दिवस असल्याने कालपरवापर्यंत शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून दिसत होत्या. मात्र मोदींच्या ‘सर्जीकल स्ट्राईक’मुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. तर व्यापाऱ्यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेण्यास विरोध केल्याने अनेक खरेदीदार आल्यापावली सामान ठेवून घराकडे परतले. याची माहिती सर्वत्र पसरताच भंडारा शहरातील बाजारपेठेत आज बुधवारला सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. यामुळे एकट्या भंडारा शहराचा विचार केल्यास व्यापाऱ्यांच्या गल्ल्यावर सुमारे ६० ते ७० टक्क्यांचा तोटा आला.

Web Title: Dread, tension and running ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.