स्वप्न साकारून देशाचे ऋण फेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:21 PM2017-12-01T22:21:40+5:302017-12-01T22:22:13+5:30
आयुष्यात योग्य दिशेने गेले पाहिजे, सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे. बालक ही संस्कारक्षम असतात.
लोकमत आॅनलाईन
मोहाडी : आयुष्यात योग्य दिशेने गेले पाहिजे, सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे. बालक ही संस्कारक्षम असतात. निसर्गात घडणाºया प्रत्येक बाबीचे ते निरीक्षण करतात. अनेक प्रश्न बालकांच्या मनात घर करतात. भविष्य घडविणारे विद्यार्थ्यांनी स्वप्ने बघायला हवेत. स्वप्ने ही साकारता आली पाहिजेत. स्वत:च्या जीवन समृध्दतेतून देशाचे ऋणही फेडता यावे, असे प्रतिपादन नगर पंचायतच्या नगराध्यक्ष स्वाती निमजे यांनी केले.
जिल्हा परिषद हायस्कुल मोहाडी येथे दोन दिवसीय तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बक्षीस वितरक या नात्याने त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगर पंचायतचे उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे होते. मंचावर अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास पराते, गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, प्राचार्य वसुंधरा सुखदेवे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव देवीचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, नईम कुरेशी, यशवंत थोटे, केंद्र प्रमुख जयंत उपाध्ये यांची उपस्थिती होती.
बालकांना अविष्कार करण्याचे माध्यम विज्ञान प्रदर्शन आहे. यातून कल्पना साकारल्या जातात. विज्ञान प्रदर्शन बालकांना वैज्ञानिक बनण्याची संधी ही उपलब्ध करुन देते असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन जोशी यांनीही मत व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून ४९ विज्ञान प्रतिकृती, प्राथमिक गटातून २९, विज्ञान परिचर गटातून २ प्रतिकृती, शिक्षक साहित्य माध्यमिक ४, प्राथमिक २, लोकसंख्या या विषयावर माध्यमिक व प्राथमिक गटातून दोन प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.
प्राथमिक गटातून प्रथम पुरस्कार वैभव पुडके, जि.प. हायस्कुल आंधळगाव, द्वितीय पुरस्कार प्रणाली सेलोकर, जि.प. हायस्कूल डोंगरगाव, तृतीय पुरस्कार प्रयास बडवाईक, सुलोचना देवी पारधी विद्यालय मोहाडी यांना देण्यात आला. माध्यमिक गटातील प्रथम बक्षीस सौरभ बांते सनफलॅग वरठी, द्वितीय बक्षीस शिवम् आस्वले जि.प. हायस्कूल आंधळगाव, तृतीय बक्षीस समसुध्दीन शेख, जि.प. हायस्कूल वरठी या विद्यार्थ्यांना देण्यात आला. परिचर सहायक गटातून मोहन वाघमारे फुले हायस्कूल मोहगाव देवी यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. शिक्षक शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटातून निशिकांत बडवाईक जि.प. प्राथमिक शाळा सकरला यांना तर, माध्यमिक गटातून डी. जी. टिळे जि.प. हायस्कूल जांब यांना प्रथम बक्षीस देण्यात आला. लोकसंख्या शिक्षण प्राथमिक येथून पी.पी. शहारे, जि.प. प्राथमिक शाळा बोथली, माध्यमिक गटातून के. एस. रेहपाडे, रंभाड हायस्कुल नरसिंहटोला या शिक्षकांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. परिक्षकाचे कार्य एस. बी. रामटेके, पी.पी. मारबते, वाय. टी. चामट या विज्ञान शिक्षकांच्या चमुने केले. संचालन माधवी राऊत यांनी केले. आभार वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे यांनी मानले.
उदासिनता अन् शिस्तीचा अभाव
मोहाडी तालुक्यात ९४ शाळा प्रगत आहेत. ९५ शाळा डिजीटल झाल्या आहेत. असे असतानी विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती आणण्यासाठी शिक्षकांची उदासिनता दिसली. प्राथमिक शाळा ३९ व माध्यमिक शाळा ३२ या शाळांमधुन २४५ प्रतिकृती विज्ञान प्रदर्शनात येणे अपेक्षित होत्या. तथापि केवळ ९३ प्रतिकृतीचा समावेश होता. ही चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच परिक्षण झाल्यानंतर लगेच प्रतिकृती शिक्षकांनी उचलून घरची वाट पकडली. विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व विज्ञान शिक्षक यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाला राहण्याचे सौजन्य दाखविले नाही. यातून शिस्तीचा अभाव जाणवला.