लाखांदूरवासीयांचे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 09:57 PM2019-08-20T21:57:11+5:302019-08-20T21:57:38+5:30
औषधोपचारात आणि रुग्णसेवेत अव्वल असणारे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाला सुविधांअभावी अद्यापही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला नाही. एक्सरे, सोनोग्राफी मशीन बंद असून शीतगृहाअभावी लघु रक्तपेढीही निकामी ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : औषधोपचारात आणि रुग्णसेवेत अव्वल असणारे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाला सुविधांअभावी अद्यापही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला नाही. एक्सरे, सोनोग्राफी मशीन बंद असून शीतगृहाअभावी लघु रक्तपेढीही निकामी ठरत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न भंगत असल्याची चर्चा परिसरात आहे.
लाखांदूर ग्रामीण रुग्णालयांतर्गत ८९ गावांचा समावेश आहे. ३० खाटांची येथे सुविधा आहे. तालुक्यातील रुग्णांना प्राथमिक उपचार मिळावे हा यामागील उद्देश आहे. दिघोरी, बारव्हा, सरांडी आणि कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या रुग्णालयांतर्गत येतात. आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर रुग्णांना लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाते. विविध आजारावर येथे उपचार केले जातात. अपघातातील जखमींसह प्रसुतीपूर्व महिलांना देखील लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयातच दाखल केले जाते.
दरम्यान मागील दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रुग्णालयात विविध सुविधा मिळण्यासाठी शासनाकडून कोणताही प्रयत्न झाला नाही. उलट रुग्णालयातील एक्सरे मशीन तंत्रज्ञाअभावी बंद पडली आहे. सोनोग्राफी मशीनची अवस्था तीच आहे.
दरम्यान काही वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा दर्जा देण्यासाठी सोनोग्राफी मशीनसह लघु रक्तपेढी मंजूर करण्यात आली. मात्र ही सुविधादेखील अद्यापपर्यंत कार्यान्वीत झाली नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय भंगल्याची चर्चा आहे.
निवासस्थानांकडे कर्मचाऱ्यांची पाठ
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अधिकारी व कर्मचाºयांसाठी बांधलेले निवासस्थाने मोडकळीस आले आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून दीड किमी अंतरावर ही निवासस्थाने बांधली आहेत. परंतु नाल्या, रस्ते,पाणी यासह विद्युतकरणाचे काम अद्यापही झाले नाही. त्यामुळे कोणीही येथे राहायला जात नाही. जणू ही शासकीय निवासस्थाने मोडकळीस आले असून कर्मचाºयांना गावात भाड्याचे घर शोधावे लागत आहेत.