विरलीत भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:57+5:302021-06-30T04:22:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.) : सध्या सुरू असलेल्या ईटान ते विरली (बु.) रस्ता बांधकामात येथील पाणी पुरवठा योजनेची ...

Drinking water crisis in rare seasons | विरलीत भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट

विरलीत भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.) : सध्या सुरू असलेल्या ईटान ते विरली (बु.) रस्ता बांधकामात येथील पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, गावकऱ्यांना भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणी पुरवठा योजना कार्यरत आहे. येथे १ लाख २५ हजार लीटर क्षमतेचे जलकुंभ असून, सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांद्वारे गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातो.

सध्या सुरू असलेल्या विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामांतर्गत या रस्त्यावरील छोटेखानी पुलांचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे पूर्वी रस्त्याच्या कडेने असलेली पाइपलाइन आता रस्त्याच्या मधोमध आलेली आहे. या रस्त्यावर विरली (खुर्द) जवळच्या कालव्यावरील पुलाच्या बांधकामामुळे पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन फुटली आहे. परिणामी, या पाइपलाइनला यू टर्न देऊन पाइपलाइनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे; मात्र यू टर्न देऊन केलेली जोडणी पाइपलाइनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाइपलाइन सटकत आहे. त्यामुळे या पाइपलाइनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून, स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या रस्त्यावर अशा प्रकारच्या एकूण सात पुलांचे बांधकाम प्रस्तावित असून, भविष्यात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्राम प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याची गरज आहे.

पाइपलाइनच्या सदर समस्येमुळे येथील नळांना गत दोन दिवसांपासून पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. येथे ११ हातपंप आहेत; मात्र त्यापैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. तर काही नागरिक गावाशेजारच्या शेतातील मोटारपंपांवरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. त्याचप्रमाणे येथील काही शेतकऱ्यांवर गुरांसाठी टँकरने पाणी आणण्याची पाळी आली आहे.

पाणी समस्येचे ग्रहण सुटणार कधी?

येथील पाणी समस्या ही विरलीकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. दर २० - २५ दिवसांनी येथील पाणी पुरवठा योजनेत कधी पाइपलाइन फुटणे, कधी मोटारपंप जळणे यांसारखे काही ना काही दोष येऊन गावकऱ्यांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील पाणी समस्येचे ग्रहण सुटणार कधी? असा गावकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.

कोट बॉक्स

विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामात पाणी पुरवठा योजनेची सुमारे ८० मीटर पाइपलाइन फुटली. पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. लवकरच गावकऱ्यांना नळांद्वारे पाणी मिळेल.

-- लोकेश भेंडारकर

सरपंच, विरली (बु.)

Web Title: Drinking water crisis in rare seasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.