सांडपाणी वाहणाऱ्या नालीतून भरावे लागते पिण्याचे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:43 PM2024-08-06T12:43:19+5:302024-08-06T12:45:03+5:30
कुंभली येथील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : नजीकच्या कुंभली येथे सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीत चक्क घागर व गंज ठेवून पिण्याचे पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
साकोली तालुक्यातील चुलबंद नदीला लागून कुंभली धर्मापुरी हे गाव आहे. या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात असून ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजना आहे. पाणीपुरवठा योजनेमार्फत गावात नळाद्वारे पाणी सोडले जाते. मात्र, पाइपलाइनमधून पाण्याचा फोर्स नसल्याने नळांना फोर्सने येत नाही. परिणामी नागरिकांना आपल्या खाजगी नळांना खड्डे खोदून गटार वाहून जाणाऱ्या नालीमधून पिण्याचे पाणी भरावे लागते. नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. परिणामी या ठिकाणाहून पाणी भरताना हे जीवजंतू पिण्याच्या पाण्यात जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तरीही पर्याय नसल्यामुळे नागरिक सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीतूनच पिण्याचे पाणी भरतात.
नालीला लागून असलेल्या नळातून पाणी भरताना महिला.
कुंभली गावची पाइपलाइन जीर्ण झाली असून तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आलेला आहे. लवकरच या गिरणा पाइपलाइनचे काम पूर्णतः जाऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा आमच्या प्रयत्न आहे. मात्र, तोपर्यंत नळधारकांनी स्टॅण्ड पोस्ट लावूनच पाणी भरावे.
- उमेद गोडसे, सरपंच