करडी परिसरात दुष्काळसदृश स्थिती
By admin | Published: December 25, 2015 01:47 AM2015-12-25T01:47:04+5:302015-12-25T01:47:04+5:30
शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे.
शेतकरी संकटात : कमी पैसेवारी घोषित करण्याची मागणी
करडी (पालोरा) : शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे. अंतिम आणेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबर रोजी जाहिर होणार आहे. करडी क्षेत्रात यावर्षी किडीच्या व रोगांच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. करडी परिसरातील गावे कमी आणेवारीच्या क्षेत्रात समाविष्ट करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र शेंडे यांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासनानेही आणेवारी काढण्याच्या पध्दतीत बदल केला आहे. अंतिम आणेवारी घोषित करण्याअगोदर प्रथम नजर आणेवारी काढली जाते. त्यानंतर दुसरी सुधारित जाहिर केली जाते.
त्यानंतर तिसरी व अंतिम आणेवारी घोषित केली जाते. मागील वर्षापर्यंत अंतिम आणेवारी जाहिर करण्याचा १५ जानेवारी असायचा मात्र त्यात शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बदल करण्यात आला आहे. आता ३१ डिसेंबर रोजी अंतीम आणेवारी जाहिर करण्याचा निर्णय झालेला आहे.
यावर्षी धानाचे मुख्य पिक नजरेला भरणारे दिसत होते. चांगले उत्पादन मिळण्याची आशा व्यक्त होत होती. धानाला, तिळ व तुरिला किड व इतर रोगांनी मोठ्या प्रमाणात ग्रासले. होत्याचे नव्हते झाले. पिक कापणी व मळणी नंतर प्रत्यक्ष पिकाचा उतारा अतिशय कमी निघाला. एकरी तिन ते चार पोते धानाचे उत्पादन हाती मिळाले. एकरी २० ते २२ हजाराचा खर्च झाला असतांना उत्पादन मात्र २ ते ३ हजाराचे मिळाले. काही ठिकाणी तो पाच ते दहा पोत्यांचा निघाला.
करडी परिसरात कमी नव्हे ऐवढे कमी उत्पादन शेतकऱ्यांना झाले. लागलेला उत्पादन खर्चही यातून निघालेला नाही. घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत शेतकरी आहेत. अंतिम आणेवारीत करडी परिसराचा समावेश करावा. परिसर दुष्काळग्रसत घोषित करावे या मागण्याचे निवेदन मोहाडी तहसिलदारांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)