जिल्ह्यातील तीन तालुक्यात होणार दुष्काळाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:00 PM2018-10-13T23:00:54+5:302018-10-13T23:01:14+5:30
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर खरिपाचा दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर खरिपाचा दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपीक धोक्यात आले आहे. अनेक गावातील धानपीक पिवळे पडले असून करपत आहे. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. २०१८ च्या खरीप हंगामात सप्टेंबर अखेर करण्यात आलेल्या मुल्यांकनानुसार पवनी, मोहाडी व लाखनी या तीन तालुक्यांमध्ये ट्रिगर दोन लागू झाला आहे.
ट्रिगर एक व दोन तालुके निश्चित करण्यासाठी शासनाने एमआरएसएसी च्या सहाय्याने मुल्यांकन करण्यासाठी महामदत नावाची संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण करून त्याचे अहवाल शासनाला पाठविले जाणार आहे.
शासनाने दुष्काळ घोषित करण्यासाठी ७ आॅक्टोबर २०१७ च्या निकषाप्रमाणे नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरीपाचा दुष्काळ ३१ आॅक्टोबरला जाहीर होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील सरासरीच्या ७५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे, अशा तीन तालुक्यांची निवड ट्रिगर दोन साठी झाली आहे. आता या तालुक्यातील गावांची निवड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना दिले आहेत. मोहाडी आणि लाखनी तालुक्यातील प्रत्येकी ११ तर पवनी तालुक्यातील १६ गावांची रँडम पद्धतीने निवड करण्यात आली आहे. या गावातील प्रमुख पिकांचे सर्वेक्षण गटनंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे.
या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे. या गटातील पीक, शेतकºयांची माहिती, पीकांची सद्यस्थिती, पीकांचे फोटो याविषयीची माहिती मोबाईलवर अपलोड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी संबंधितांना याबाबत सूचना दिल्या असून दैनंदिन प्रगतीचा अहवाल दररोज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे निर्देश पाठविण्यात आले आहे.
खरीप हंगामातील पीकांची कापणी करण्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर आॅक्टोबर अखेर शासन खरीपाचा दुष्काळ जाहीर करणार आहे. आता कोणत्या गावांना शासन दुष्काळग्रस्त घोषीत करते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याने संपूर्ण जिल्हा घोषीत करावा अशी मागणी आहे.
या गावांची झाली सर्वेक्षणासाठी निवड
च्जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पवनी, मोहाडी, लाखनी या तीन तालुक्यातील ३८ गावांची निवड ट्रिगर दोनच्या सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात मोहाडी तालुक्यातील पांजरा, हिवरा, बेटाळा, बच्छेरा, करडी, आंधळगाव, हरदोली, टाकळी, कांद्री, सालई बुज., निलज खुर्द, लाखनी तालुक्यातील आलेसूर, केसलवाडा, खैरी, भूगाव, बंधरझरी, मानेगाव, खैरी, खुर्शीपार, मलकाझरी, डोंगरगाव, शिवणी तर पवनी तालुक्यातील राजकोटा, मांगली चौरास, किसनापूर, इटगाव, सोनेगाव, कोसरा, रेवानी, पवना खुर्द, सावरगाव रनाळा (अन्नपुर्णा), प्रधान, मुरमाडी, लवारी, चिचबोडी, भिकारमिन्सी, आंबाडी या गावांचा समावेश आहे.