मादक द्रव्याची नशा, अनमोल जीवनाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:48+5:302021-06-29T04:23:48+5:30
सडक-अर्जुनी : ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा ...
सडक-अर्जुनी : ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फिन, हेरॉईन, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) वगैरे पदार्थांचा अमली पदार्थांत समावेश केला जातो.
स्पिरिटचाही नशेसाठी अशाच प्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटिक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर होऊ लागला आहे. मात्र, या सर्वांमुळे आपल्या शरीराचा हळूहळू नाश होत असून, मादक द्रव्याची नशा, अनमोल जीवनाची दुर्दशा करणारी असल्याचे प्रतिपादन न्या. विक्रम आव्हाड यांनी केले.
तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त वतीने न्यायालय सभागृहात आयोजित जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर. के. लंजे, ॲड. सुरेश गिऱ्हेपुंजे, ॲड. डी. एस. बन्सोड उपस्थित होते.
पुढे बोलताना न्या. आव्हाड यांनी, २६ जून हा दिवस अमली पदार्थविरोधी दिन म्हणून का साजरा करतात, तसेच भारतात एनडीपीएस ॲक्टनुसार (नार्कोटिक ड्रग्ज ॲन्ड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ॲक्ट-१९८५) ्रअमली पदार्थ वापरणे, बाळगणे, साठवणूक करणे, वाहतूक करणे, तस्करी करणे गुन्हा असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक ॲड. गिऱ्हेपुंजे यांनी केले. अमली पदार्थ सेवन केल्याने जीवनाचा कसा ऱ्हास होतो, अमली पदार्थ आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात, या पदार्थांचे सेवन करणे किती घातक असते, त्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात, याबद्दल ॲड. गिऱ्हेपुंजे यांनी मार्गदर्शन केले. ॲड. लंजे यांनी, अमली पदार्थ म्हणजे काय, त्याची सवय कशी लागते, अमली पदार्थाची तस्करी कुठून होते, तसेच कायद्यामध्ये त्याबाबत काय तरतुदी आहेत, देशामध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व उपस्थितांना अमली पदार्थ सेवन न करण्याबद्दल शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन ॲड.ओ.एस. गव्हाणे यांनी केले. आभार ॲड. डी. एस. बन्सोड यांनी मानले.
कार्यक्रमासाठी सहायक अधीक्षक भालेराव व संपूर्ण न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.