कोरोना लसीकरणासाठी आज जिल्ह्यात ड्राय रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:03+5:302021-01-08T05:56:03+5:30
भंडारा : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालिम घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून शुक्रवार ८ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय, ...
भंडारा : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालिम घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून शुक्रवार ८ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय आणि धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लस न देता लसीकरणाची प्रक्रिया अर्थात ड्राय रन राबविली जाणार आहे. तिन्ही ठिकाणी प्रत्येकी २५ अशा ७५ व्यक्तींचा या रंगीत तालिममध्ये समावेश असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपात्कालीन वापरासाठी हा ड्राय रन घेतला जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ७ हजार ६०८ हेल्थ केअर वर्करला लस दिली जाणार आहे. लाभार्थ्यांची को-विन ॲपवर नोंदणी झाली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. लसीकरणाची रंगीत तालिम अर्थात ड्रायरन घेण्यासाठी भंडारा जिल्हा रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय आणि धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजतापासुन ड्राय रनला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर २५ जणांमधून प्रत्येकाला ठरलेल्या वेळेत बोलाविले जाईल. केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एकाची मदत घेतली जाईल. ओळख पटल्यावर ड्राय रन टेस्ट पोर्टलवर संबंधित व्यक्तीची नोंद घेतली जाईल. लसीचा डोस देण्याच्या कक्षात संबंधिताला पाठविले जाईल. तेथे लस मिळाल्याची नोंद घेऊन पुढील ३० मिनिटे निरीक्षण कक्षात बसवून ठेवले जाईल. आरोग्य कर्मचारी त्यांचे निरीक्षण करतील.
जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.प्रशांत उईके यांच्या मार्गदर्शनात कोरोना लसीकरणाची रंगीत तालिम घेतली जाणार आहे. यासाठी संपूर्ण आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
बाॅक्स
लस न देता राबविली जाणार संपूर्ण प्रक्रिया
जिल्ह्यात लवकरच कोरोना लस उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ही रंगीत तालिम आहे. जिल्ह्यातील तीन केंद्रावर ७५ व्यक्तींचा या प्रक्रियेत समावेश राहणार आहे. रंगीत तालिममध्ये लस न देता लसीकरणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यातून आगामी काळात होणाऱ्या कोरोना लसीकरणाबाबत निर्णय घेतले जातील. आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे हेही यातून पुढे येणार आहे.