रेती तस्करांसाठी सुकळी रेतीघाट सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:45+5:302021-04-20T04:36:45+5:30
तुमसर तालुक्यातील सुकळी(देव्हाडी) येथे गावाजवळ दीड किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीचा रेती घाट आहे. या घाटातून रेती तस्करी जोमात ...
तुमसर तालुक्यातील सुकळी(देव्हाडी) येथे गावाजवळ दीड किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीचा रेती घाट आहे. या घाटातून रेती तस्करी जोमात सुरू आहे. वैनगंगेचे पात्र येथे विस्तीर्ण असून, नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती आहे. या घाटाचा लिलाव झालेला नाही, परंतु नियमबाह्य रेतीचे उत्खनन सुरू आहे. याकडे खनिकर्म व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नदीपात्रातून आतापर्यंत लाखोंच्या रेतीची चोरी झाली आहे. तस्करांनी नदीपात्र ओरबडून काढले आहे. लिलाव झालेल्या घाटा सारखीच येथे उत्खनन करण्यात येते. गावापासून रेतीघाट लांब असल्याने कोणी फिरकत नाही. याच संधीचा फायदा रेती तस्कर घेत आहेत. येथील नदीपात्र विद्रूप झाले असून, पर्यावरणाला येथे धोका निर्माण झाला आहे, तसेच शासनाचा लाखोंचा महसूल दरवर्षी येथे बुडतो. महसूल प्रशासन या रेती घाटाचा लिलाव का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक
सुकळी येथे नदीपात्रातील चोरीच्या रेतीची वाहतूक रोहा, बेटाळा मार्गाने सुरू आहे. भंडारा शहराजवळील दाभा येथे हा थेट रस्ता जातो. भंडारा शहरातून किंवा वरठी मार्गाने रेती नागपूरकडे वाहतूक केली जाते. परिसरातील काही रेती चोरटे तथा नागपूर येथील रेती कंत्राटदार रेतीची विल्हेवाट लावतात. रेती घाटातून रेतीची चोरी होत असल्याची माहिती सर्वांना आहे, परंतु येथे कधीच मोठी कारवाई झालेली दिसत नाही.
बॉक्स
केवळ रेती साठ्यावर कारवाई
सुकळी येथील नदीघाटातील रेती साठ्यावर प्रशासनाने कारवाई केलेली. काही दिवसांनंतर पुन्हा रेतीचोरी करण्यात येते. राजकीय पाठबळ असल्याने, येथे कधीच मोठी कारवाई होत नाही अशी चर्चा आहे.
रेती उत्खनन व रेती चोरी रोखण्याकरिता महसूल विभागाचे कडक नियम आहेत, परंतु येथे नियमांना ठेंगा दाखविला जात आहे. तालुका स्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत महसूल प्रशासनाचे अनेक अधिकारी आहेत, परंतु सुकळी येथील नदी घाटातील चोरी थांबली नाही.