डीएसओ म्हणतात, केरोसीनच्या काळाबाजाराची माहिती द्या
By admin | Published: November 28, 2015 01:37 AM2015-11-28T01:37:36+5:302015-11-28T01:37:36+5:30
तूर डाळ काळाबाजारी करणाऱ्यांवर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले.
डाळीच्या धाडसत्रावर पांघरूण : हिवाळी अधिवेशनात प्रकरण गाजणार, अहवालात होणार फेरबदल
प्रशांत देसाई भंडारा
तूर डाळ काळाबाजारी करणाऱ्यांवर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. कारवाईच्या नावावर अर्थपूर्ण व्यवहार करून प्रकरण दडपण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने ‘कारवाईच्या नावावर अधिकाऱ्यांची शिजली डाळ’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोडे म्हणतात, डाळीची साठेबाजरी सोडा, केरोसीनच्या काळाबाजाराची माहिती द्या.
राज्यात कधी नव्हे ती, यावर्षी तूर डाळीच्या दरात विक्रमी वाढ झाली. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला. त्यांच्या जेवनातून वरण गायब झाल्याचे चित्र दिसू लागले. डाळ विक्रेत्यांकडून साठेबाजी करण्यात आल्याने डाळीचे भाव वाढल्याचे लक्षात येताच अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांवर साठेबाजारंवर छापे घालण्याचे आदेश दिले होते. डाळीच्या साठेबाजीचे लोण राज्यभर असल्याने भंडारा जिल्ह्यातही पुरवठा विभाग व तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठांवर दिवाळीदरम्यान छापे घातले. ही कारवाई या अधिकाऱ्यांनी दिवसरात्र एक करून केली. कारवाईसाठी शासकीय वाहनांचा वापर करण्यात आला. यावर हजारो रूपयांचा इंधन खर्च करूनही एक छदामही तूर डाळ जप्त करण्यात विभागाच्या पथकाला यश आले नाही.
विशेष म्हणजे, या पथकाने अनेक व्यापाऱ्यांना साठेबाजीच्या नावावर अक्षरश: वेठीस धरले. कारवाईच्या नावावर त्यांच्याकडून व्यवहार करून साठेबाजी नसल्याचे दाखवून कारवाई न करताच रिकाम्या हाताने परतले. दिवाळीसारखा सणात या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने व्यापाऱ्यांनीही गप्प राहणेच पसंत केले. मंत्र्यांचे अधिकारी ऐकत नसल्याचा यापेक्षा आणखी दुसरा दाखला होवू शकत नाही.