निधीअभावी रखडली सिंचन योजना
By admin | Published: May 26, 2015 12:39 AM2015-05-26T00:39:05+5:302015-05-26T00:39:05+5:30
इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात सोडण्यात यावे या मागणीसाठी मागील १० वर्षापासून दिघोरी परिसरातील ..
व्यथा झरी उपसा सिंचन योजनेची : आश्वासनाची पूर्तता होणार केव्हा?
लाखांदूर : इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात सोडण्यात यावे या मागणीसाठी मागील १० वर्षापासून दिघोरी परिसरातील शेतकऱ्यांचा शासनाविरूद्ध लढा सुरू आहे. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी व बारव्हा परिसरातील २ हजार ५१५ हेक्टर शेतजमिन सिंचनापासून वंचित आहे. यासाठी आमरण उपोषण, धरणे आंदोलन, पाणी दो या मौत दो व जलरामाधि सारखे अभिनव आंदोलने माजी समाज कल्याण सभापती जि.प. भंडारा चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी केले होते. अनेक वेळा सरकारने भरभरून आश्वासनही आंदोलनकर्त्यांना दिले होेते. परंतू अद्याप या झरी उपसा सिंचन योजनेला निधी उपलब्ध झाला नसल्या कारणाने ही योजना रखडली असून २ हजार ५१५ हेक्टर शेतजमिन सिंचनापासून वंचित आहे.
गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणातून पाणी कालव्याद्वारे झरी तलावात सोडून ते पाणी बारव्हा व दिघोरी परिसरातील एकूण २५ गावातील सुजलाम सुफलाम करणारी ही योजना मागील १० वर्षांपासून अखेरची घटका मोजत आहे. झरी तलाव हे मुर्झा गटग्रामपंचायत हद्दीत येते. भर पावसाळ्यातही हे तलाव हे मुर्झा गटग्रामपंचायतच्या हद्दीत येते. भर पावसाळ्यातही हे तलाव पाण्याने तुडूंब भरलेले असते. ही योजना पूर्ण झाल्यास पर्यटन स्थळाच्या यादीत पुन्हा एक स्थळ यादीत समाविष्ट होणार आहे. झरी तलाव हे १०.५० हेक्टर क्षेत्रात विस्तारले आहे. इटियाडोह धरणाचे १२.९४ दषलक्ष घनमीटर पाणी झरी उपसा सिंचनाकरीता पुरेषे आहे. या भागातील शेतकरी अजुनही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षी शेतीतील उत्पन्न पावसाअभावी मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. आत्महत्याचे प्रमाण या भागात जास्त आहे. तर कर्जबाजारी शेतकरी व्याजाचे पैसे बँकामध्ये भरण्यासाठी शेती मातीमोल भावाने विकण्यासाठी काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी ही योजना सुरू करणे या योजनेकरीता शासनाने अनेकदा सर्वे केले. आस्वासनेही दिली. परंतू निधी उपलब्ध करून दिला नाही. २ हजार ५१५ हेक्टर शेतजमिनामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये भंडारा जिल्ह्यातील झरी, मुर्झा, मालदा, दिघोरी, सालेबर्डी, साखरा, तावशी, चिकना, जैतपूर, बारव्हा, चिचाळ, दहेगाव, मुरमाडी, कोदामेडी, पारडी व गोंदिया जिल्ह्यातील देवूळगाव, बोदरा या गावांचा समावेश आहे. माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी १८ आॅक्टोंबर २००० ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तेव्हा नागपूर येथील हिवाळी अधिवेशात चर्चा करू व झरी उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळून लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतू तसे झाले नाही.
दि.१० डिसेंबर २००१ ला नागपूर हिवाळी अधिवेषनाच्या दरम्यान झरी तलावाच्या पाळीवर आमरण उपोषण व सामुहिक जलसमाधिचा इशारा दिला होता. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिस अहमद यांनी प्रत्येक्ष आंदोलन स्थळी येवून तीन महिन्याच्या आत ही योजना सुरू करू असे आश्वासन दिले होते. दि. २ मार्च २००६ ला मुंबई आझाद मैदान येथे मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले होते.
साकोली आगाराची बसची तोडफोड करून आंदोलनाचे हिंसक वळन घेतले होते. दि.१४ नोव्हेंबर २००७ ला टेंभूर्णे यांना आंदोलनादरम्यान १३ दिवसांचा तुरूंगवासही भोगावा लागला.
अखेर दि. १२ जानेवारी २०१० च्या पत्रानुसार कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग भंडाराकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र शासनास सादर करण्यात आले. दि.५ मे २०१० ला संबंधित विभागाकडून फेरनियोजनास शासनाची मान्यता करीता राज्यपालांनी निर्देश दिले. त्या आधारावर दि. १७ आॅगस्ट २०१० ला मंत्रालयातील पत्रानुसार वनविभाग व प्रकल्पाला मान्यता दिल्याचे पत्र पाठविण्यात आले. परंतू झरी उपसा सिंचन योजनेकरीता महाराष्ट्र शासनाने अद्याप निधी मंजूर केला नाही. त्यामुळे २ हजार ५१५ हेक्टर क्षेत्र अजूनही सिंचनापासून वंचित आहे. (तालुका प्रतिनिधी)