अॅन्टी करप्शनच्या भीतीने वनाधिकारी धास्तावले!
By admin | Published: February 2, 2015 10:59 PM2015-02-02T22:59:16+5:302015-02-02T22:59:16+5:30
प्रत्येक कार्यालयात काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. अनेकदा अधिकारी तथा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे मागील काही
मुख्य प्रवेशद्वारावर होते नोंदणी : कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकांवर करडी नजर
भंडारा : प्रत्येक कार्यालयात काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. अनेकदा अधिकारी तथा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे मागील काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. याची धास्ती घेवून भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली असून मुख्य प्रवेशद्वारावरच नोंदणी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.
राज्यातील महसूल, वन विभाग तथा भूमिअभिलेख कार्यालयासह अन्य विभागातही मागील काही दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्ट्राचारी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेकांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडून कारवाईचा सपाटा अॅन्टी करप्शन विभागाने सुरू केला आहे. यामुळे अनेक विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती बसली असली तरी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही.
नवीन वर्षातील महिनाभरातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात शंभरावर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही याची धास्ती घेतली आहे. आतापर्यंत कधी नव्हे ते या विभागाच्या अधिकाऱ्याने मुख्य प्रवेशद्वारावरच एका कर्मचाऱ्याची नोंदणी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी त्याच्याजवळील रजिस्टरमध्ये कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तथा कर्मचाऱ्यांची इतंभूत माहिती नोंद करतो. त्यानंतरच त्या अभिव्यक्तीला कार्यालयात जाण्यासाठी प्रवेश दिल्या जातो. याबाबत लोकमत प्रतिनिधीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील वरिष्ठ लिपिकाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे काम नसलेले नागरिकही नाहक येवून तासन्तास बसून असतात. यामुळे कार्यालयीन कामाचा खोळंबा होतो. अशा व्यक्तींवर वचक बसावा यासाठी नोंदणीची ही नवीन शक्कल काढल्याची माहिती दिली आहे. यामुळे काही प्रमाणात आळा बसल्याचेही या लिपीकाने सांगितले.
बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात येते. मात्र येथील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी असे कुठलेही बंधन या कार्यालयाने घातलेले नाही. त्यामुळे नागरिक किंवा बाहेरील कर्मचाऱ्यांसाठी घातलेले हे बंधन सध्या कर्मचाऱ्यांमध्येच औत्सुक्याचे ठरले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे वचक नसल्याने किंवा त्यांची बाहेर जाण्याची नोंदणी होत नसल्याने ते अनेकदा कार्यालयीन वेळेतच समोरील चहाटपरीवर दिसून येतात. अशा कर्मचाऱ्यासाठी वनाधिकाऱ्यांनी नोंदणी रजिस्टर ठेवावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. (शहर/नगर प्रतिनिधी )