धानाच्या वाणात भेसळ, अधिकारी बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:34 PM2018-11-14T22:34:34+5:302018-11-14T22:34:53+5:30
धानाचे वाण भेसळयुक्त व निकृष्ट निघाल्याने वारपिंडकेपार परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात सुमारे ३४ टक्के भेसळ असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : धानाचे वाण भेसळयुक्त व निकृष्ट निघाल्याने वारपिंडकेपार परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात सुमारे ३४ टक्के भेसळ असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांनी वारपिंडकेपार येथील शेतकरी देवेंद्र कोटांगले यांच्या शेतातील धानपीक निकृष्ट व खराब असल्याची तक्रार केली होती. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, केव्हीकेच्या संचालिका उषा डोंगरवार यांनी या प्रकरणी दखल घेतली. सोमवारी कोटांगले यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली. कोटांगले यांनी बाजारातून धानाचे वाण खरेदी केले होते. धानाच्या लोंबीतील धान खराब असल्याचे दिसून आले. कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीत ३३.४८ टक्के धानपीक निकृष्ट असल्याचे निदर्शनात आले.
सदर अहवालावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर पुणे येथील कृषी आयुक्तालयांकडे अहवाल पाठविला जाणार आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी कलाम शेख व पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
या पाहणीच्या वेळी तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, विस्तार अधिकारी बोरेले, कृषी सहाय्यक वाळवी, फासे, वारपिंडकेपारच्या सरपंच बबिता पटले, उपसरपंच रमेश तोरणकर, माजी सरपंच ओमकांत बुराडे आदी उपस्थित होते.
देवेंद्र कोटांगले यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ३४ टक्के धान निकृष्ट असल्याचे आढळले. लवकरच अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठविला जाईल.
-एस.एस. गायधने, कृषी अधिकारी, तुमसर.