संचारबंदीमुळे मजुरांचे लोंढे परतू लागले गावांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:32+5:302021-05-16T04:34:32+5:30
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता पादुर्भाव असून, राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपुरात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांतही ...
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता पादुर्भाव असून, राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपुरात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांतही कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांत वाढ होत आहे. राज्य सरकार जनजागृती करण्याचे प्रयत्न करीत असले तरी, नागरिक ऐकायला तयार नाहीत. ग्रामीण भागात विदारक चित्र निर्माण झाले आहे. लग्न, वाढदिवस, समूहाची गर्दी बेधडक सुरू आहे. कुणी अंकुश लावण्याचे प्रयत्न करीत नाही. सिहोरा परिसरात तर कोविड १९ हद्दपार झाल्याच्या अविर्भावात नागरिक वावरत आहेत. यामुळे बेफिकीरपणे कामकाज सुरू झाले आहे. राज्य शासन कोरोना विषाणू पादुर्भाव रोखण्यासाठी गंभीर असले तरी, नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडत आहे. शासनाने अनलॉक प्रक्रिया राबवीत जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे बजावण्यात येत आहे. परंतु स्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. आठवडाभराचा लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन घेत आहे. लॉकडाऊनमध्ये नागपुरातील मजुरांचे लोंढे गावाकडे परतले होते.
या कालावधीत त्यांना गावातच रोजगार प्राप्त झाले होतो. रोहयो आणि शेतीची कामे सुरू होती. शहरातून गावांत परतणाऱ्या मजुरांना गावाने आधार, आश्रय दिला होता. परंतु अधिक दिवस रोजगार उपलब्ध झाला नसल्याने पुन्हा मजुरांचे लोंढे नागपूरच्या दिशेने निघाले होते. नागपुरात कामे शोधल्यानंतर संसाराचा गाडा रेटू लागले. आता पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पादुर्भावाने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने उपराजधानीत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कुशल कामे थांबविण्यात आली असल्याने मजुरांना काम मिळेनासे झाले आहे. हातात असणारा रोजगार हिरावल्याने मजूर पुन्हा गावांच्या दिशेने निघाले आहेत. नजीकच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येने गावाकडे परतले आहेत. सिहोरा परिसरातील मजूर गावात दाखल झाले आहेत. परंतु गावात रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात रोहयोअंतर्गत कामांना सुरुवात करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणाचा फटका मजुरांना बसला आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात रोहयोच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले, गोंडीटोला ग्रामपंचायतीच्या सदस्य शीतल चिंचखेडे यांनी केली आहे.