शेतकरी आत्महत्या शासनाच्या उदासीन धोरणांमुळे
By Admin | Published: June 19, 2017 12:28 AM2017-06-19T00:28:19+5:302017-06-19T00:28:19+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, ..
प्रफुल्ल गुडघे पाटील : प्रकरण शेतकरी आत्मदहनाचे, लोकप्रतिनिधींनी घेतली शेंदरे कुटुबीयांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, अशा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी लावला. जांभोरा येथील मृतक शेतकरी ताराचंद शेंदरे यांच्या कुटूंबीयांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथील आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, पिक विमा योजनेचा लाभ द्यावा, आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी केली. काँग्रेसतर्फे पिडीत कुटूंबीयाला दहा हजारांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रमोद तितीरमारे, महेंद्र निंबार्ते, प्यारेलाल वाघमारे, मानिकराव ब्राम्हणकर, अमर रगडे आदी उपस्थित होते. यादरम्यान लोकमतच्या वृत्तानंतर राजकिय पक्षांनी याची दखल घेत जांभोरा येथे जावून शेंदरे कुटुंबियांची भेट घेतली. यात माजी आमदार तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय सत्तेकार, सुरेश सज्जा आदींनी समावेश आहे.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांच्या आत्महत्या भूषणावह नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. शेंदरे कुटुंबियाची मी स्वत: भेट घेतली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी तहसीलदारांना तशी सूचना दिली आहे. मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविण्यासाठी पोलिसांना सांगितले आहे. विरोधक या प्रकरणाला राजकिय रंग देत आहेत.