धानाचा उतारा घसरल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:21 PM2017-11-19T23:21:15+5:302017-11-19T23:22:58+5:30
परिसरातील धान मळणी सुरू झाली आहे. अख्ख्या जिल्ह्यात धानाचा उतारा अत्यल्प येत असून शेतकरी चिंतातूर झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : परिसरातील धान मळणी सुरू झाली आहे. अख्ख्या जिल्ह्यात धानाचा उतारा अत्यल्प येत असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशी स्थिती असताना प्रशासनाने आणेवारी ६० टक्क्याच्यावर दाखविली आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.
भंडारा जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. या कोठाराचे वैभव दिवसेंदिवस हटविले जात आहे. शासनाने झाल्याने धानाच्या धोरणात अपेक्षित बदल केलेले नाही. हतबल शेतकºयांचे कोण ऐकणार असा प्रश्न धान उत्पादकांना पडला आहे. ओरिसात धानाला २,९९० एवढा भाव मिळतो. आंध्रप्रदेश, गुजरात राज्यात धानाला प्रोत्साहन राशी दिले जाते. मग आम्हाला का नाही, असा प्रश्न चावळीवर चर्चीला जात आहे.
महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतात बुलेट ट्रेन व समृद्धी महामार्गाकरिता कोट्यवधींचे कर्ज घेत प्रत्येक भारतीयाला कर्जाचे भागीदार बनविले जाते. सुखसोई शहरात पुरविल्या जातात. मग ग्रामीणांना का नाही? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करीत सत्ता भोगण्याकरिता पुढारी अग्रस्थानी आहेत. पण त्याची दूरावस्था दूर करण्याकरिता पुढे का येत नाही हे अनाकलनीय आहे.
भंडारा जिल्ह्यात हल्ली ६२ हमी धान केंद्रातून धान खरेदी सुरु आहे. पंधरा दिवस लोटले. मात्र निधी मिळाला नाही. धान विकले खरे पण पैसाच पदरात नसल्याने उधारीवरच सर्व सुरु आहे. महाकर्जमाफीच्या घोषणेला साडेचार महिन्याचा कालावधी लोटत असताना पहिल्या हिरव्या यादीत २२०८ नावे जाहीर करण्यात आले. परंतु आजपर्यंत प्रत्येक लाभ जिल्हा बँकेशी निगडीत ७६ शेतकऱ्यांनाच झाला आहे. साडेचार महिन्यानंतर या ७६ शेतकºयांच्या खात्यात दोन दिवसापूर्वी ३०-२४ लाख रूपये जमा झाले आहे. पुन्हा ग्रीन यादी जाहीर होईपर्यंत उर्वरितांना प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चितच !
एका एकरात १२ पोती एवढीच पीक झाल्याने वर्षभर उदरनिर्वाह व बँकेचे पिककर्ज कसे फेडावे या विवंचनेत आयुष्य खर्ची होत आहे. काय करावे सुचत नाही. शासनाच्या कुचकामी धोरणाने धान उत्पादकांची वाट लागली आहे. बोनस, सानुग्रह निधी, प्रोत्साहन निधी अंतर्गत शासनाला जेवढे शक्य असेल तेवढे करीत शेतकऱ्यांची हिंमत वाढवावी.
-क्रिष्णा पराते, धान उत्पादक पालांदूर.