धान खरेदी केंद्रावर धानाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 09:44 PM2017-11-09T21:44:29+5:302017-11-09T21:44:41+5:30
यावर्षी अत्यल्प पावसामुळे ४० ते ४५ टक्केच रोवणी झाली. रोवणी झालेल्या धानाची कशीबशी जोपासना केली. मात्र ऐनवेळी तुडतुडा या रोगाने धानाचे होत्याचे नव्हते केले.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : यावर्षी अत्यल्प पावसामुळे ४० ते ४५ टक्केच रोवणी झाली. रोवणी झालेल्या धानाची कशीबशी जोपासना केली. मात्र ऐनवेळी तुडतुडा या रोगाने धानाचे होत्याचे नव्हते केले. त्यामुळे यावर्षी उत्पादनात कमालीची घट दिसून आली.
साकोली धानखरेदी केंद्रावर मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाची आवक निम्म्यावर आली आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. मात्र धानच नसल्याने सुरुवातीचे आठ दिवस तर धानाची आवक झाली नाही. त्यानंतरही धानाची आवक नाहीच्या बरोबर आहे. साकोलीच्या धान खरेदी केंद्रावर कालपर्यंत ३ हजार ५९८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. तर मागील वर्षी याच महिन्यात ५ हजार २०० क्विंटल धान खरेदी झाली होती. विर्शी धान खरेदी केंद्रावर कालपर्यंत फक्त ७५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले तर मागील वर्षी याच महिन्यात खरेदी ही २ हजार क्विंटल धानाची होती. या आकडेवारीवरुन मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची धानाची आवक ही निम्म्यावरच आहे. त्यामुळे शेतकºयाची आर्थिक स्थिती अडचणीत सापडली आहे.
तुडतुडा व मावा किडीने केला कहर
यावर्षी धानपिकावर तुडतुड्याने आक्रमण केले. शेतकºयांनी विविध औषधी फवारणी केली. मात्र तुडतुड्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधी कुचकामी ठरली. मात्र या संकटसमयी कृषीविभाग अपयशी ठरला. त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना कामात आल्या नाही.
केंद्राचे गोदाम भाडे थकित
साकोली येथील धान खरेदी केंद्राचे २०१० पासूनचे २०.५१ लाख रुपये गोदाम भाडे थकित आहेत. धान खरेदी केंद्राचे सन २०१५-१६ व २०१६-१७ चे धान खरेदीचे ३३.४० लाख रुपये कमीशनही थकित आहे. एकीकडे शासन शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेतात व दुसरीकडे शेतकºयांना अडचणीत आणते.