पोळा सणावर दुष्काळाचे सावट
By admin | Published: September 7, 2015 12:52 AM2015-09-07T00:52:28+5:302015-09-07T00:52:28+5:30
पावसाळ्याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
शेतकरी हवालदिल : कोरड्या दुष्काळाने हिरावला पुरणपोळीचा घास
राहुल भुतांगे तुमसर
पावसाळ्याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आठवडाभरावर पोळा सण येवून ठेपला आहे. तरीही पाऊस बेपत्ताच असल्याने शेतकऱ्यांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. परिणामी शेतकऱ्याबरोबर दिवस-रात्र काळ््या मातीची (आईची) सेवा करत राब- राब राबणाऱ्या बैलांच्या व शेतकऱ्यांच्या मुखातील पुरणपोळीचा घास यंदांच्या दुष्काळाने हिरावून घेतल्याची खंत शेतकरी व्यक्त करित आहेत.
तुमसर तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत तसेच चिखलाजिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या गणेशपूर, पवनारखारी, लोभी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, सितासांवगी, खंडाळे, गुढरी, सक्करदरा, मोकोटोला, चिचोली, राजापूर, हिरापूर, हमेशा, घानोड, भोंडकी, गोबरवाही, हेटी धामनेवाडा या गावात भीषण कोरड्या दुष्काळाचे चित्र बघावयास मिळत आहे. या गावातील ९० टक्के शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र पावसाने चांगलाच दगा दिल्याने गावातील तलाव तर सोडाच, परंतु जंगलव्याप्त रानतलावात बैलांना आंघोळ घालावी, इतकेही पाणी जमा झाले नाही. शेतकरी धान पिकाची शेती करणार तरी कसा? असा सवाल उपस्थित झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या हजारो हेक्टर जमिनी पडीकच ठेवल्याचे विदारक चित्र बघावयास मिळते. ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे मिळेल त्या साधनांने धान पिकाची शेती केली त्या शेतकऱ्यांच्या विहरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी शेतात घातलेला हजारो रुपयांचा रासायनिक खत दृष्टीस पडत असून मोठमोठ्या भेगा शेतात पडल्या आहेत. पिके करपायला लागले आहेत. चारा-पाण्याअभावी अर्धपोटी असलेली अशक्त झालेली जनावरे दावणीला हंबरडा फोडतांना पाहून शेतऱ्यांच्या डोळ््यात पाणी तरळू लागले आहे. हिरव्या शेताचे गत वैभव आठवत परिसरातील शेतकरी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन देत आहेत.शेतकऱ्यांच्या पोळासणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाणी नाही आणि बाजारासाठी जवळ पैसे नाही.महागाईने उच्चांक गाठल्याने तिखटमिठावरच पोळा सण साजरा करण्याची वेळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचा मित्र, आद्यदैवत बैलाना जिवंत ठेवण्याकरिता शेतकऱ्यांनी लावलेले मात्र पुर्णत: करपलेले पऱ्हे जनावरांसाठी वैरण बनविले आहेत.
पोळा सण तोंडावर आला असून आता पावसाच्या आशा संपुर्णत: मावळत्या असून शासनानी या परिसरात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची व्यवस्था करुन शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळापासून दिलासा देण्याची गरज आहे.
दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना शेतकऱ्यांचा वाली म्हणविणारे नेते भूमिगत झाले असले तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरिता आंदोलन उभारणार.
- ठाकचंद मुंगुसमारे,
रायुकां, तुमसर.
शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने रोजगार हमीचे कामे परिसरात सुरु करुन उपाययोजना करावी.
- दिलिप सोनवाने
सरपंच, चिखला.