दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट

By Admin | Published: April 17, 2015 12:38 AM2015-04-17T00:38:58+5:302015-04-17T00:38:58+5:30

दुष्काळात तेरावा महिना अशी फार जुनी म्हण प्रसिद्ध आहे. ती म्हण आता सत्यात उतरु लागली आहे. दुष्काळी कामावर

Due to drought-hit work | दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट

दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट

googlenewsNext

अवकाळी पावसाचा फटका : मजुरांचे स्थलांतरण, रोहयोची कामे झाली बंद
उसर्रा :
दुष्काळात तेरावा महिना अशी फार जुनी म्हण प्रसिद्ध आहे. ती म्हण आता सत्यात उतरु लागली आहे. दुष्काळी कामावर अवकाळी पावसाचा फटका बसल्याने दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीत मागील महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. कधी ऊन्ह तर कधी पाऊस असे चक्र असून दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस आल्याने मजूर वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. दिवसभर घाम गाळणारा मजूर शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर राबराब राबतो. पण अवकाळी पावसाने मजुरांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. मोहाडी तालुक्यातील ग्राम उसर्रा येथे मागील काही दिवसांपासून शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नाला सरळीकरणाचे काम जोमात सुरु होते. सुखराम पुंडे ते बुधन ठाकरे यांच्या शेतापर्यंत सुमारे एक किलोमिटर अंतराचे हे नाला सरळीकरणाचे काम सुरु होते. यावर अंदाजे सहाशे मजूर कामावर होते. सन २०१५-१६ या नवीन आर्थिक वर्षातले हे पहिलेच काम होते.दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नाला तुडूंब भरून गेला व मजुरांची हातची रोजी गेली. गत सहा दिवसांपासून काम बंद असल्याने मजूरांनी नाराजी व्यक्त केली. बारा दिवसाचे मस्टर मागणी शासनाकडे केली होती व त्या कामाचे मस्टर सुद्धा निघाले आहेत. मात्र अवकाळी पावसाने मजुरांच्या आशेवर पाणी फेरले आहे. यावर्षी पाऊस अवेळी आल्याने शेतकऱ्यांचे हातचे धानपिक गेले. त्यातच कवडीमोल भावाने धानाची विक्री केल्याने बळीराजा दुखावला. मागील महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे, जवस, लाखोरी, गहू, उडीद सारखे पिके नष्ट झाली. कर्जबाजारी असलेल्या शेतकरी, शेतमजूरावर दु:खाचे डोंगर आहे. अशातच गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरु झाल्याने मजुरांच्या आशा पल्लवीत झाल्या.
या दरम्यान अवकाळी पाऊस आल्याने व बावनथडीच्या पात्रातून सरळ नाल्यात पाणी आल्याने नाला तुडूंब भरला आहे. त्यामुळे दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट पसरले आहे. पोटाची खळगी भागविण्यासाठी काही मजूर शहराकडे स्थलांतरीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. यात काही मजूर बेलदारी कामासाठी तुमसरला तर काही नागपुरसारख्या शहरात कामाच्या शोधात निघाले आहेत. याशिवाय काही उपाय मजुरांसमोर दिसत नसल्याचे मजुरांनी सांगितले. (वार्ताहर)

उसर्रा येथील नाला सरळीकरण कामासाठी मजुरांना काम मिळावा म्हणून आपण सातत्याने प्रयत्न केला पण अवकाळी पावसामुळे नाला तुडूंब भरला आहे. त्यामुळे सदर काम बंद करण्यात आले आहे. नाल्यातला पाणी कमी झाल्यास तात्काळ काम सुरु करण्यात येईल.
- दीनदयाल पटले
ग्रामरोजगार सेवक, उसर्रा

Web Title: Due to drought-hit work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.