पराभवाच्या भीतीने दिला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:38 AM2017-12-09T00:38:41+5:302017-12-09T00:39:01+5:30
लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्यां २०१९ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल, या भीतीमुळे नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला असा आरोप भाजपच्या आमदारांनी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन केला.
पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर कोणताही फरक पडणार नसल्याचे सांगून आमदार चरण वाघमारे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा हा सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या बळावर २०१४ ची निवडणूक त्यांनी जिंकली. निवडणूक जिंकून आता सरकारवर आरोप करणे तथ्यहीन आहे. केंद्र सरकारने मागील साडेतीन वर्षांत कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली. केंद्राच्या ९८ योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात १९ हजार ५३७ कोटी रूपये जमा केले आहे.
परंतु पटोले यांनी या योजनांचा लाभ शेतकरी व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. संसदेत जनतेचे प्रश्न कधीही मांडले नाहीत. त्यामुळे येणारी निवडणूक जिंकणे कठीण वाटत होते. याशिवाय जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपचे आमदार असल्यामुळे विधानसभेचीही उमेदवारी मिळणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे मागील महिन्यांपासून भाजप पक्ष नेतृत्वाविरूद्ध वक्तव्य करणे सुरू केले तेव्हापासूनच पक्षाचा राजीनामा देतील, असे वाटत असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ.उल्हास फडके, मुकेश थानथराटे उपस्थित होते.