आगीमुळे वन्यजीवांची गावाकडे धाव
By admin | Published: March 12, 2017 12:41 AM2017-03-12T00:41:08+5:302017-03-12T00:41:08+5:30
मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात.
उन्हाळा तापला : वन विभागाने दखल घेण्याची गरज, वनसंपदेचे मोठे नुकसान
साकोली : मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात. तर काही जीव वाचविण्याच्या आकांतात सैरावैरा पळत सुटतात.ते वन्यजीव अनेक वेडा लोकवस्तीचा आश्रय घेतात व त्यांची शिकार केली जाते.
जंगलाना आगी लागल्याचे अनेक कारणे सांगितली जातात. ग्रामीण भागात मोहफुल वेचण्यासाठी जाणारे लोक त्या झाडा खालील पालापाचोळा जाळतात. ती आग पसरत जाऊन जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. तसेच जंगलाशेजारी असणारे शेतकरी आपल्या शेतातील धुरे जाळण्यासाठी आगी लावतात. व त्याच्या दुर्लक्षाने ती आग जंगलापर्यंत पसरत जाते. पुढे त्यांचे वनव्यात रूपांतर होते. जंगलांना आगी लागण्याचे तिसरे कारण म्हणजे तंदुपत्ता ठेकेदार जास्त तेंदुपत्ता मिळावा म्हणून जंगलात आगी लावण्याचे अघोरी काम करतात. या तेंदुच्या झाडांची मुळे १३ ते १४ फुट खोलवर गेलेली असतात. त्यामुळे झाडांना दिर्घायुष्य असते. आगी लावण्यात आल्या तर इतर प्रकारची झाडे जळून जातात व या तेदुच्या मुळांना जागोजागी नवे फाटे फुटतात. जंगलाना लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीवांचीच हाणी होते असे नाही तर शासनाचे सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची संपत्ती खर्चुन लावलेली नवीन रोपटे ही या आगीत जळून खाक होतात. इकडे शासनाद्वारे सांगितले जाते दरवर्षी या भागात वृक्षारोपण केले पण या आगीत ते स्वाहा झाले. याची नोंद मात्र नसते.
आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी करोडो रुपयांची वनसंपदा व वन्यजीव या आगीत होरपडतात. शासन मात्र काही उपाययोजना करतांना दिसत नाही. जंगलाचा झपाट्याने होणारा ऱ्हास आणि वनव्यामुळे मानव आपल्यावर फार मोठे संकट ओढावून घेत आहे. तसेच जंगलातील प्राणीही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधार्थ गावात येतात किंवा आगी लागल्यामुळे ते गावाकडे धाव घेतात. व शिकारीला बळी पडतात. (तालुका प्रतिनिधी)
वनतस्करांची कुऱ्हाड
नैसर्गिक संपदेने नटलेल्या साकोली तालुक्यात घनदाट जंगल आहे. मात्र अलीकडे या जंगलातील सागवनासह आडजात वृक्षांवर तस्करांची कुऱ्हाड चालत आहे. वनविभागाची गस्त नाममात्र असल्याने तस्करामध्ये कुणाचेही वचक नाही. परिणामी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट होण्याची भिती निर्माण झाली आहे.