पुरामुळे पऱ्हे व रोवणी पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:34 PM2019-08-04T22:34:16+5:302019-08-04T22:34:41+5:30
आठवडाभरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे चौरास भागातील रोवणी व पऱ्हे सडले आहे. आता पुन्हा पऱ्हे शेतात टाकून रोवणी होण्याची शक्यता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : आठवडाभरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे चौरास भागातील रोवणी व पऱ्हे सडले आहे. आता पुन्हा पऱ्हे शेतात टाकून रोवणी होण्याची शक्यता नाही.
गत आठ-दहा दिवसांपासून सखल भागातील रोवणी व पऱ्हे पाण्याखाली आली आहेत. शेतातील पाणी निघत नसल्याने धान पीक सडून पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था व बँक यांच्याकडून पीक कर्ज घेतलेले आहे. या पीक कर्जावर बँकांनी पिक विम्याची रक्कम सुद्धा कपात केलेली आहे. अनेक वर्षापासून शेतातील नुकसान होऊन पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत असून शेतकºयांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. यावर्षी चौरास भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पुराचे पाणी बांधातून निघत नसल्यामुळे शेतात रोवणी झालेले पीक, रोवणीसाठी टाकण्यात आलेले धानाचे पऱ्हे यांची स्थिती अंत्यंत दयनिय आहे.
खरीप पिकाच्या रोवणीला विलंब झाल्यामुळे गेलेल्या पिकाच्या जागेवर खरीपाचे कोणतेच पीक शेतकरी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शेतात रब्बी पीक घेण्यासाठी तीन महिने वाट पहावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधातील सडलेल्या पऱ्हे व रोवणीच्या शेतातील सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी, अशी मागणी चौरास भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.