गोसीखुर्दचा जलस्तर वाढविल्याने धान शेतीत शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 10:48 PM2018-09-26T22:48:17+5:302018-09-26T22:48:43+5:30
राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणात जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले असून प्रकल्पाचा जलस्तर २४३.५०० मीटरवर पोहचला आहे. त्यामुळे अड्याळ परिसरातील शेकडो एकर शेतात पाणी शिरले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वी आणि कोणतीही सूचना न देता जलस्तर वाढविल्याचा आरोप महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणात जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले असून प्रकल्पाचा जलस्तर २४३.५०० मीटरवर पोहचला आहे. त्यामुळे अड्याळ परिसरातील शेकडो एकर शेतात पाणी शिरले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वी आणि कोणतीही सूचना न देता जलस्तर वाढविल्याचा आरोप महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीने केला आहे.
पवनी तालुक्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा जलस्तर ११ सप्टेंबर रोजी २४३ मीटर नोंदविण्यात आला होता. त्यानंतर जलस्तर वाढविण्यास प्रारंभ झाला. जलस्तर वाढविण्यापूर्वी बुडीत क्षेत्रातील येणाºया नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील गावे खाली करण्यात आली होती. जलस्तर वाढविणे सुरु झाल्यानंतर सोमवारी या प्रकल्पातील जलस्तर २४३.४०० मीटर झाला होता. मंगळवारी हा जलस्तर २४३.५०० मीटरवर जाऊन पोहचला. यावर्षी २४४.५०० मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचा विचार प्रकल्प विभागाचा आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाचा जलस्तर वाढविला जात असल्याने अड्याळ जवळील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. २०० हेक्टर शेतीची अधिग्रहण प्रक्रिया नागपूर उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने रद्द केली होती. त्यामुळेच या प्रकल्पाचा जलस्तर २४२ मीटर स्थिर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा २३ नोव्हेंबर २०१७ च्या आदेशाला स्थगिती देत प्रकल्पग्रस्तांना अवार्डचे पैसे देण्याचे निर्देश दिले होते.
परिणामी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने या प्रकल्पातील जलस्तर वाढविण्यास प्रारंभ केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जलस्तर २४४.५०० मीटर वाढविण्याचे लक्ष आहे. अड्याळ परिसरातील ६६ प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार यांनी यावर आक्षेप घेतला आहे. मुलकलवार म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पात जलस्तर वाढविण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी जलस्तर वाढविणे योग्य नाही. आता अनेकांच्या शेतात पाणी शिरले असून त्यातील अनेक शेतकºयांना जमीन अधिग्रहणाचा मोबदलाही मिळाला नाही. त्यामुळे आम्ही या विरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगितले.
२४३.७०० मीटर पर्यंत वाढणार जलस्तर
गोसीखुर्द सिंचन योजनेचे शाखा अभियंता पी.डी. चवरे म्हणाले, प्रकल्पात यावर्षी पाऊस कमी झाल्याने जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा जलसाठा २४४.५०० मीटर पर्यंत वाढविण्यात आला आहे. यावर्षी हा जलसाठा २४३.७०० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांच्या वतीने भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया रद्द करण्याच्या संदर्भातील अपील विदर्भ सिंचन विकास महामंडळाकडे आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने यावर आतापर्यंत कोणताही निर्णय दिला नाही. अंतिम निर्णय येईपर्यंत या प्रकल्पाचा जलसाठा वाढवू नये.
-धनंजय मुलकलवार, अध्यक्ष, महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समिती.