प्रवासी प्रतिसाद नसल्याने मुक्कामी एसटी गाड्यांंची संख्या झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:17 AM2021-09-02T05:17:07+5:302021-09-02T05:17:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र त्यानंतरही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र त्यानंतरही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला अद्याप प्रवासी प्रतिसाद नाही. परिणामी महामंडळाची अडचण वाढली असून यात आगारांना चांगलाच फटका बसत आहे. मध्यंतरी राखीमुळे वाढलेली थोडीफार वर्दळ फक्त आठवडाभरच राहिली व आता पुन्हा लालपरी मोजक्याच प्रवाशांना घेऊन धावत आहे. एकंदरीत, जेमतेम डिझेल काढावे एवढ्यावरच आगाराचा कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे भंडारा आगाराच्या जिल्ह्यात २८ मुक्कामी गाड्या होत्या; मात्र प्रतिसादच नसल्याने त्या गाड्या कमी करण्यात आल्या.
बॉक्स
ग्रामीणांनी प्रवास टाळला
यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह ग्रामीण भागातही चांगलाच कहर केला. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रवास टाळल्यासारखेच दिसत आहे. शिवाय शेतीची कामे सुरू असल्यानेही एसटीत गर्दी नाहीच. त्यातही नागरिकांनी आता प्रवासी वाहनांत प्रवास करून धोका पत्करण्याशिवाय खासगी वाहनाने प्रवासाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.
बॉक्स
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या जेमतेम
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राज्य शासनाने परवानगी देताच आगाराकडून एसटी पुन्हा रस्त्यावर उतरविण्यात आली. यात शहराच्या ठिकाणी म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी व नागपूरच्या गाड्यांना काही प्रमाणात प्रवासी प्रतिसाद आहे. यामुळेच या गाड्या सुरू असून आगाराकडून त्यांना चालविले जात आहे.
कोट
किन्ही येथे मुक्कामी गाडी येत होती ती आता बंद होणार असल्याची माहिती आहे. यामुळे आता गोंदियाला जावे लागल्यास अडचण होते. गाडी नसल्याने स्वत:च्या गाडीनेच प्रवास करावा लागतो. हे त्रासदायक असले तरी आपल्या सुविधेनुसार प्रवास करता येतो. कोरोना नंतर प्रवासासाठी पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे.
- एक प्रवासी
कोट
प्रवासी प्रतिसादच नाही
मुक्कामी जाणाऱ्या गाड्या सुरू केल्या होत्या. मात्र कोरोनाच्या धास्तीने त्यांना प्रवासी प्रतिसादच नसल्याने ९ गाड्या बंद करण्याचा विचार सुरू आहे. लाटेची स्थिती व प्रवाशांचा प्रतिसाद बघता गाड्या पुन्हा वाढविता येतील.
- एक अधिकारी